मोडक सागर धरणाला लागली गळती, पूर नियंत्रण दरवाजांचे दोन्ही रबर सील नादुरुस्त;दुरुस्तीसाठी पालिका 98 लाख रुपये खर्च करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया मोडक सागर धरणाचे पूर नियंत्रण दरवाज्याचे रबर सील नादुरुस्त झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रबर सील नादुरुस्त झाल्याने मोडक सागर धरणातून पाणी गळती होत आहे. पावसाअभावी पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. धरणातील पाणीसाठा खालावल्याने आता रबर सील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल 98 लाख रुपये खर्च करणार आहे. उद्या बुधवारी होणाऱया स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुंबईला दररोज साधारणतः 4000 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा आणि भातसा धरणांतून हा पाणीपुरवठा केला जात असून त्यापैकी मोडक सागर धरण हे अतिशय महत्त्वाचे धरण आहे. यातून मुंबईला प्रतिदिन 1700 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा होतो. उर्ध्व वैतरणा आणि मध्य वैतरणा धरणांतील पाणीसाठा हा मोडक सागर धरणात सोडला जातो आणि वैतरणा पात्रातील संपूर्ण पाणी हे मोडक सागर धरणाद्वारे मुंबई शहराला पुरविले जाते. मोडक सागर धरणावर आठ पूर नियंत्रण दरवाजे असून त्यांना विशेष प्रकारचे रबर सील दिलेले आहेत. धरण सुरक्षितता संघटना यांनी केलेल्या तपासणी खराब झालेले रबर सील बदलण्याच्या सूचना केलेल्या आहेत.