
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी अत्यंत वेगवान कारवाई करत आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसवर धडक देत झाडाझडती घेतली. टीईटीचे पेपर याच प्रेसमधून छापले गेले असून येथूनच डेटा लिक झाल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, फरार सूत्रधार विजेंदर गुप्ता याच्या शोधात बिहारमधील पाटणा येथे गेलेल्या पोलिसांनी विजेंदरची पत्नी सुमनकुमारी गुप्ता हिला ताब्यात घेतले असून भिवंडी न्यायालयाने तिला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 28 जून रोजी होणार होती, मात्र आदल्या दिवशीच भिवंडीमधून हा पेपर फुटला. तीन आरोपी तो दीड कोटी रुपयांना विकणार होते. मात्र भिवंडी पोलिसांनी त्याआधीच त्यांच्यावर झडप घातली. आता या पेपरफुटीतील मुख्य फरार सूत्रधार विजेंदर गुप्ता याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली. त्यातील एक पथक टीईटीचे पेपर जिथे छापले गेले त्या आग्रा येथील प्रेसमध्ये दाखल झाले. पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने या प्रेसचा ताबा घेतला आहे.
कर्मचाऱ्यांची झाडाझडती; सीसीटीव्ही तपासणी
पेपर छापण्यासाठी आल्यानंतर प्रिंटिंग प्रेसमध्ये कोण आत आले, कोण बाहेर गेले, संशयास्पद हालचाली कोणाच्या आहेत याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. या पेपरफुटीच्या आंतरराज्य टोळीत कोणाचा हात आहे याचा शोध घेण्यासाठी प्रेसमधील कामगार आणि व्यवस्थापनाची स्वतंत्र चौकशी केली जात आहे.
मुख्य आरोपीच्या बायकोला अटक
सुमनकुमारी गुप्ता हिला भिवंडी न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एम. सुतार यांच्यासमोर हजर केले असता तिला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. सरकारी वकील ऍड. सुभाष जाधव यांनी मुख्य सूत्रधार विजेंदर हा सतत त्याची पत्नी सुमनकुमारी हिच्याशी मोबाईलवरून संपर्कात होता. त्यामुळे या पेपरफुटीतून काही आर्थिक लाभ मिळाला का या तपासासाठी सुमनकुमारी हिला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती.































































