
पावसाळा सुरू होताच रायगड जिल्ह्यात दरडी कोसळण्याचा धोका वाढतो. मातीची धूप आणि भूजल पातळी घसरण्याच्या समस्येवर उपाय म्हणून प्रशासनाने यंदा मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीचा आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात तब्बल २० लाख बांबू रोपांची लागवड करण्यात येणार असून दरडग्रस्त आणि मातीची धूप होत असलेल्या गावांना बांबूचे संरक्षक कवच वरदान ठरणार आहे.
रायगडमध्ये गेल्या काही वर्षांत अतिवृष्टीमुळे डोंगर उतारांवरील माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माती घट्ट धरून ठेवणारा आणि कमी कालावधीत वाढणारा बांबू हा प्रभावी पर्याय मानला जात आहे. त्यामुळे वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड मोहीम राबवली जात आहे.
रोपवाटिकांमध्ये निर्मिती
सध्या जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये ४९ हजार २६९ बांबू रोपे तयार झाली असून उर्वरित रोपांची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. वनविभाग रोहा यांच्या ५, वनविभाग अलिबाग यांच्या १५, सामाजिक वनीकरण विभागाच्या १४ आणि कृषी विभागाच्या ७ अशा एकूण ४१ रोपवाटिकांमध्ये रोपनिर्मितीचे काम सुरू आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वेश्वी येथील शासकीय रोपवाटिकेत बांबू रोपनिर्मितीचा विशेष प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून महिला बचत गट, स्वयं सहाय्यता गट आणि शेतकऱ्यांना रोजगारासोबत पर्यावरण संवर्धनाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. शेतकऱ्यांना पडीक जागेत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केल्या.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक वनहक्क पट्टे दिलेले असून रोपे तयार झाल्यावर ही रोपे प्रामुख्याने जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क जमिनीवर लागवड करण्याचे नियोजन आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा हे गाव सीएफआरच्या अशा शाश्वत व्यवस्थापनातून समृद्ध झाल्याने या गावाचे उदाहरण आहे, तसेच प्रयत्न जिल्ह्यात केले जात आहेत.
किशन जावळे, जिल्हाधिकारी.
या गावांना प्राधान्याने लाभ
रायगड जिल्ह्यात दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असलेली ३९२ गावे असून सर्वात जास्त १४० गावे पोलादपूर तालुक्यात आहेत. तर महाड १२१, रोहा २०, म्हसळा १४, माणगाव २२, पनवेल ३, खालापूर १२, कर्जत ५, सुधागड ९, श्रीवर्धन १२, तळा ३, अलिबाग ९, मुरुड ९, पेण तालुक्यात १३ गावे दरडग्रस्त आहेत. या दरडग्रस्त गावांमध्ये प्राधान्याने बांबू लागवड केली जाणार आहे.






























































