त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन गैरप्रकाराची चौकशी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक व भाविक यांच्यात झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.

विधान परिषदेत शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी आमदार भावना गवळी, प्रवीण दरेकर, किशोर दराडे यांनीदेखील उपप्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना राज्यमंत्री आशीष जयस्वाल म्हणाले, त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाइन पोर्टलद्वारे दररोज सुमारे दोन हजार भाविकांना, तर ऑफलाइन व्यवस्थेद्वारे सुमारे सात हजार भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तातडीच्या दर्शनासाठी निर्धारित शुल्क आकारून विशेष पासची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबविण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार आहे.