
>> दुर्गेश आखाडे
प्रत्येकाच्या मनात समुद्राबद्दल भीती असते. ही भीती घालवण्यासाठी 1984 पासून ज्यांनी रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अनेक जणांना समुद्रात पोहायला शिकवले असे जलतरणपटू,प्रशिक्षक आणि माजी सैनिक शंकरराव मिलके यांचे वयाच्या 86 व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांनी महाराष्ट्रातील 25 हजार जणांना पोहायला शिकवले. जलतरण प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
शंकरराव मिलके हे मूळचे कोल्हापूर, गडहिंग्लजमधील रहिवासी होते. शेतकरी कुटुंब असल्याने त्यांना शेतीच्या कामात आवड होती. शिक्षणाचे महत्त्व कळल्याने दिवसा शेतात काम करून रात्री प्रौढ साक्षर वर्गात त्यांनी शिक्षण घेतले. सहा महिन्यांत एक इयत्ता असे दोन वर्षांत चौथीपर्यंत शिक्षण शंकररावांनी पूर्ण केले. त्या काळात त्यांच्या गावाजवळून गोव्याच्या दिशेने सैनिक जात असतं. त्या सैनिकांना पाहून आपणही सैन्यात जावे असे त्यांना वाटू लागले. शंकरराव 1962 साली सैन्यात भरती झाले. जबलपूरला त्यांचे प्रशिक्षण झाले. त्यांना वायरलेस सिग्नल आणि ड्रायव्हरचे काम होते. चौथीपर्यंतच शिक्षण झाल्याने शंकरराव मिलके यांना इंग्रजी येत नव्हते. प्रशिक्षण सुरू असताना रात्री जागून त्यांनी इंग्रजी आणि रोमन भाषेचे धडे गिरवले.1964 ला त्यांची पंजाबला नेमणूक झाली.1965 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. ते कमांडर यांचे गाडीचालक होते. यावेळी त्यांनी वायरलेसवरून संदेशवहनाचेही काम केले होते. 1965 च्या युद्धात हिंदुस्थानचे सैन्य लाहोरपर्यंत घुसले होते. त्यावेळी शंकरराव मिलके यांची राष्ट्रपती पदकाची संधी हुकली तेव्हा कमांडर यांनी विशेष शिफारस करून सेवाज्येष्ठता डावलून शंकरराव मिलके यांना टेक्निकल क्लास वन अधिकारी हे पद दिले होते. त्यांनी 1971 च्या युद्धातही सहभाग घेतला होता.1977 ला ते सैन्यातून निवृत्त झाले. त्यानंतर एसटी महामंडळात त्यांनी चालक म्हणून सेवा बजावली.
शंकरराव मिलके हे स्वतः जलतरणपटू होते. त्यांनी रत्नागिरीत स्थायिक झाल्यानंतर समुद्रावर पोहण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मात्र त्यापूर्वी त्यांनी समुद्राचा बारकाईने अभ्यास केला. भरती-ओहोटी, समुद्राच्या लाटा आणि भोवरे यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी भगवती बंदर येथे 1984 पासून जलतरण प्रशिक्षण सुरू करून प्रत्येकाच्या मनातील समुद्राची भीती काढून टाकत समुद्रात पोहायला शिकवले. समुद्रातच जलतरणाचे धडे मिळाल्यामुळे शंकरराव मिलके यांच्या तालमीत तयार झालेले जलतरणपटू राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवू लागले. शंकररावांनी महाराष्ट्रातील 25 हजारांहून अधिक जणांना पोहायला शिकवले आहे. त्यांच्या घरातील मुले आणि नातवंडे, सर्व जण पट्टीचे पोहणारे आहेत. शंकररावांनी रत्नागिरीत पहिल्यांदा समुद्रात पोहण्याचा स्पर्धा सुरू केली. शाळा- महाविद्यालयीन मुलांबरोबर विविध क्षेत्रांतील अधिकारी, पोलीस, वकील, तटरक्षक दलातील अनेकांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्याबाहेरील काही मंडळी रत्नागिरीत लॉजवर राहून शंकराराव मिलके यांच्याकडे समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण घेत होते. वय वर्षे 80 असताना शंकरराव मिलके यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सहभाग घेत सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले होते. वयाच्या 84 व्या वर्षीही शंकरराव जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक पटकावत होते. शंकरराव अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले. सामाजिक आणि माजी सैनिकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत होते.



























































