
नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीत हवेत गोळीबार करून एका महिला डॉक्टरच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने बिहारमधील भाजप आमदार राजू कुमार सिंह यांना ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने पीडित महिलेच्या पतीला २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. या शिक्षेमुळे राजू कुमार सिंह यांची आमदारकी रद्द होणे निश्चित झाले आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ डिसेंबर २०१८ रोजी रात्री दक्षिण दिल्लीतील फतेहपूर बेरी येथील राजू कुमार सिंह यांच्या फार्महाऊसवर घडली होती. नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान राजू कुमार सिंह यांनी मद्याच्या नशेत आपल्या परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार केला. ही गोळी डान्स फ्लोअरवर असलेल्या डॉ. अर्चना गुप्ता यांच्या डोक्याला लागली. रुग्णालयात उपचारादरम्यान ३ जानेवारी २०१९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी राजू कुमार सिंह यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (भाग २) अंतर्गत (सदोष मनुष्यवध) आणि आर्म्स ॲक्ट (शस्त्र कायदा) अंतर्गत दोषी ठरवले. शनिवारी न्यायालयाने शिक्षेची सुनावणी करताना त्यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच मृत अर्चना गुप्ता यांच्या पतीला २५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
आमदारकी धोक्यात
राजू कुमार सिंह हे बिहारच्या साहेबगंज मतदारसंघाचे सहावेळा निवडून आलेले भाजपचे विद्यमान आमदार आहेत. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, कोणत्याही खासदार किंवा आमदाराला २ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी शिक्षा सुनावण्यात आल्यास त्याचे पद तात्काळ रद्द होते. त्यामुळे आता सिंह यांची विधानसभा सदस्यता रद्द होणार आहे. बचाव पक्षाने न्यायालयात विनंती केली होती की, या शिक्षेमुळे त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल, त्यामुळे त्यांना २ वर्षांपेक्षा कमी शिक्षा देण्यात यावी, मात्र न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ही विनंती फेटाळून लावली.


























































