
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “निवडणुकीच्या वेळी मी स्वतः तुम्हाला पक्षाचे चिन्ह दिले होते, मग अवघ्या दोनच महिन्यांत तुम्ही गद्दार कसे काय झालात?” असा संतप्त सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना त्यांनी फेसबुकवर लाईव्ह येत खडेबोल सुनावले आहेत.
ममता बॅनर्जी यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर निशाणा साधताना म्हटले आहे की, ज्या नेत्यांना पक्षाने ओळख दिली, उमेदवारी दिली आणि ज्यांनी तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक जिंकली, तेच लोक आता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. अवघ्या दोन महिन्यांतच निष्ठा बदलणाऱ्या अशा विश्वासघातकी नेत्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला. ज्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने विश्वासाने मतदान केले, त्यांच्याशीही ही प्रतारणा असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेत पक्षातील गद्दारांना आणि विरोधकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


























































