सामना अग्रलेख – हे कसे ‘इन्फ्रामॅन’?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक त्यांनाइन्फ्रामॅनवगैरे म्हणतात. त्यासाठी समृद्धी महामार्गापासून मेट्रो रेल्वे, अटल सेतू, शक्तिपीठ महामार्ग, वाढवण बंदर, चौथी मुंबई, नवी मुंबई विमानतळ, मिसिंग लिंक अशी लांबलचक यादी देतात. मात्र या प्रत्येक फुग्याला वेळोवेळी टाचणी लागली आहे आणि त्याच्या जागतिक दर्जाच्या दाव्याची हवा निघून गेली आहे. सोमवारी मिसिंग लिंकचा फुगाही तेथे पडलेल्या भगदाडाने फोडला. त्यासाठी झालेला काही हजार कोटींचा खर्च तेथील धबधब्याच्या पाण्यात वाहून गेला. महाराष्ट्राच्या स्वयंघोषित इन्फ्रामॅनचे दावे कधीसमृद्धीवरील खड्ड्यात गाडले जातात तर कधीमिसिंग लिंकमधील धबधब्यात वाहून जातात. ‘हे कसे इन्फ्रामॅन?’ असा प्रश्न त्यामुळे राज्यातील जनतेला पडला आहे.

मुंबई-कोकणसह राज्यात गेल्या दोन-चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांची पुरती पोलखोल केली आहे. मुंबईतील नालेसफाईपासून राज्याच्या ‘वेगवान’ प्रगतीबाबत त्यांनी केलेले दावे निसर्गाने फोल ठरवले आहेत. मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’चा प्रचंड बोभाटा राज्य सरकारने केला होता. मात्र हा मिसिंग लिंकदेखील पहिल्याच पावसाच्या तडाख्यात ठप्प झाला. या मंडळींनी केलेल्या वेगवान प्रवासाच्या बाता सोमवारी पहाटे मिसिंग लिंकला पडलेल्या भगदाडातील धबधब्यात वाहून गेल्या. या दुर्घटनेचा अर्थ काय घ्यायचा? असे काही घडले की, निसर्गाकडे बोट दाखवून स्वतः हात वर करायचे. स्वतःच्या चुका-उणिवांवर पांघरुण घालायचे. राज्यातील सत्ताधाऱ्यांचे हेच सुरू असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत तेच केले. त्यांनी या दुर्घटनेचे खापर निसर्गावर फोडले. प्रशासनाने पूर्वतयारी केली होती, परंतु पावसाची परिस्थिती अपेक्षेपेक्षा गंभीर असल्याने हे सगळे घडले, अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली. ही त्यांची नेहमीची स्टाईल झाली आहे. याच

मिसिंग लिंकवर

काही ठिकाणी पडलेले खड्डे अलीकडेच चर्चेत आले होते. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले होते. त्यावर मुद्देसूद खुलासा करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी हे सगळे ‘इंजिनीअरिंग टेक्निक’ आहे, असा भन्नाट ‘भराव’ टाकून ते खड्डे बुजवले. हा तुमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. मात्र त्याच्या उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत तुमच्यावर सारवासारव करण्याची वेळ का आली? समृद्धी महामार्गाबाबतही या मंडळींनी असाच गवगवा केला होता. मात्र त्याच्याही जागतिक दर्जाच्या चिंधड्या पहिल्याच पावसाने उडवल्या होत्या. या महामार्गावर खड्डे आणि तडे नेहमीचेच झाले आहेत. येथील छोट्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी 24 तास विशेष पथक नेमण्याची घोषणा सरकारला करावी लागली. ‘समृद्धी’च्या जागतिक दर्जाचे हे प्रमाणपत्र समजायचे का? मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांवर रविवारी छत गळतीचे प्रकार झाले. छतामधून पाणी गळत असल्याने खाली बादल्या लावण्याची वेळ प्रशासनावर आली. गेल्या वर्षी मुंबई मेट्रोच्या भुयारी मार्गाची पोलखोल पहिल्याच पावसाने केली होती. भुयारी स्थानकांमध्ये धबधब्यासारखे पाणी कोसळत होते. सर्वत्र चिखल साचला होता. प्रत्येक बाबतीत राज्यकर्ते

जागतिक दर्जाच्या बाता

मारतात. मात्र या दाव्यांची कल्हई पहिल्याच पावसात पूर्णपणे खरवडून निघते. हे दरवर्षी घडते. मुंबईतील नालेसफाई असो की इतर पावसाळापूर्व कामे, त्यांचे पितळही पहिल्याच पावसात उघडे पडले. उघडी मॅनहोल आणि कोसळलेल्या झाडांमुळे यंदाही सहा-सात निष्पापांचे बळी घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक त्यांना ‘इन्फ्रामॅन’ वगैरे म्हणतात. त्यासाठी समृद्धी महामार्गापासून मेट्रो रेल्वे, अटल सेतू, शक्तिपीठ महामार्ग, वाढवण बंदर, चौथी मुंबई, नवी मुंबई विमानतळ, मिसिंग लिंक अशी लांबलचक यादी देतात. मात्र या प्रत्येक फुग्याला वेळोवेळी टाचणी लागली आहे आणि त्याच्या जागतिक दर्जाच्या दाव्याची हवा निघून गेली आहे. सोमवारी मिसिंग लिंकचा फुगाही तेथे पडलेल्या भगदाडाने फोडला. त्यासाठी झालेला काही हजार कोटींचा खर्च तेथील धबधब्याच्या पाण्यात वाहून गेला. महाराष्ट्राच्या स्वयंघोषित इन्फ्रामॅनचे दावे कधी ‘समृद्धी’वरील खड्ड्यात गाडले जातात तर कधी ‘मिसिंग लिंक’मधील धबधब्यात वाहून जातात. ‘हे कसे इन्फ्रामॅन?’ असा प्रश्न त्यामुळे राज्यातील जनतेला पडला आहे.