
मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयात उपस्थित राहू न शकलेल्या वकिलांविरुद्ध कोणतेही प्रतिकूल किंवा खटला फेटाळण्याचे आदेश देऊ नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने अन्य खंडपीठांना दिले.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा तसेच जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच सखल भागांत पाणी साचणे आणि अचानक पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विविध वकील संघटनांनी उच्च न्यायालयाकडे चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी स्पष्ट केले की, पावसामुळे न्यायालयात उपस्थित राहता न आल्यास कोणत्याही प्रकरणात वकिलांविरुद्ध प्रतिकूल आदेश किंवा खटला फेटाळण्याचे आदेश दिले जाणार नाहीत. मुंबई उच्च न्यायालयातील इतर सर्व खंडपीठे या भूमिकेचे पालन करतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.





























































