
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ७ जुलै पहाटे ४ वाजेपर्यंत खडकवासला धरण ६२ टक्के भरले होते. मात्र, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण लवकरच ८० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो.
यामुळे नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीपात्रा सभोवती असलेले साहित्य, जनावरे किंवा इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असेही सूचित करण्यात आले आहे. याशिवाय, सखल भागातील नागरिकांना वेळेत सूचना देऊन आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे.




























































