
आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून आज मंगळवारी (दि. ७) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आज होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी देहूत न येता ज्या ठिकाणी आहात तिथेच थांबावे. वारकऱ्यांनी आणि दिंड्यांनी पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन देहू संस्थानने केले आहे.
पालखी सोहळ्याचे ३४१ वे वर्ष आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांसमवेत पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकऱ्यांच्या सुमारे १०० दिंड्या देहूमध्ये दाखल झाल्या आहेत. पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडूनही सज्जता ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
पालखी प्रस्थान सोहळ्याला दुपारी सुरुवात
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पहाटे पाच वाजता सुरुवात होऊन शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा होईल. इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन आणि दुपारी अडीचच्या सुमारास इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात येतील. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ होईल. सायंकाळी पाच वाजता पालखी प्रदक्षिणा होऊन, पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ होईल आणि रात्री इनामदार वाड्यात मुक्काम असेल.
“पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. इंद्रायणीला पूर आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वारकऱ्यांनी देहूत येऊ नये. प्रस्थान सोहळा प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात येईल. वारकऱ्यांनी पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यातूनच पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे.”
— जालिंदर महाराज मोरे, अध्यक्ष, देहू संस्थान





























































