बेस्टचे 190 चालक पालिकेकडे उसनवारीवर; पगारासाठी 30 कोटींचा खर्च, स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिका बेस्ट उपक्रमातून १९० बसचालक उसनवारीवर घेणार आहे. त्यांच्या पगारापोटी महापालिका ३० कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला अदा करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

बेस्टला आता मुंबई महापालिका मोठा हातभार लावणार आहे. बेस्टमधील तब्बल १९० चालक उसनवारी तत्त्वावर घेऊन त्यांच्या पगाराचा खर्च महापालिका करणार आहे. पुढील एक वर्षाकरिता या बसचालकांची सेवा घेतली जाणार असून, यासाठी अतिकालीन भत्त्यासह मासिक पगार स्वरूपात १ लाख २९ हजार १४८ रुपये मोजले जाणार आहेत. यासाठी बेस्ट उपक्रमाला ३०.६२ कोटी रुपये या चालक सेवेसाठी अदा केले जाणार आहेत.

बेस्टकडे बसची संख्या कमी झाल्याने चालक अतिरिक्त आहेत, तर महापालिकेकडे वाहनचालकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, आयुक्त, वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षांसह विविध अधिकाऱ्यांना परिवहन खात्यामार्फत वाहनसेवा पुरविल्या जातात. ही वाहनसेवा विनाखंड चालू ठेवण्यासाठी, परिवहन विभागातील कार्यरत वाहनचालकांकडून अतिकालीन वेळेत (ओव्हरटाइम) काम करून घेणे अपरिहार्य ठरत आहे.

त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रथमतः बेस्ट उपक्रमाकडून एक वर्षाच्या कालावधीकरिता आणि आवश्यकता भासल्यास आणखी एक वर्षाकरिता बेस्टकडील १९० वाहनचालक उसनवारी तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मागील एप्रिल महिन्यात चर्चा आणि पत्रव्यवहार झाल्यानंतर, या वाहनचालकांना प्रतिमहा सरासरी वेतन ८४,०३४ रुपये अधिक अतिकालीन भत्ता वेतनाची प्रतिपूर्ती करण्याबाबत बेस्टने महापालिकेला कळवले आहे. आयुक्तांनी आपल्या अधिकारात ५० लाख रुपयांचे काम देण्याचा निर्णय घेतल्याने, मागील महिन्यापासून या चालकांची सेवा महापालिकेला मिळत असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.