
मोदी सरकारच्या काळात रुपयाची ज्याप्रमाणे अधोगती झाली आहे, तशीच स्थिती देशाच्या पासपोर्टची झाली आहे. ‘ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स’च्या या वर्षीच्या क्रमवारीत हिंदुस्थानच्या पासपोर्टची घसरण झाली आहे. हिंदुस्थानचा पासपोर्ट १२४ व्या स्थानावरून १२५ व्या स्थानी घसरला आहे. या क्रमवारीत पहिल्या १०० देशांमध्येही हिंदुस्थानला स्थान मिळवता आलेले नाही.
ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या क्रमवारीवरून एखाद्या देशाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि दबदबा किती आहे, याचा अंदाज येतो. हिंदुस्थानचा पासपोर्ट पहिल्या १०० देशांमध्येदेखील नाही. या क्रमवारीत २०२१ ते २०२३ या कालावधीत हिंदुस्थान १२७ व्या स्थानी होता. वर्ष २०२५ मध्ये दोन स्थानांची सुधारणा होऊन देशाचा पासपोर्ट १२५ व्या स्थानी आला होता, मात्र आता पुन्हा त्यात घसरण झाली आहे. हिंदुस्थानच्या पासपोर्टधारकांना केवळ २६ देशांमध्येच विनाव्हिसा प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
काँग्रेसची टीका पासपोर्ट रँकिंगमध्ये झालेल्या घसरणीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “जुमल्यापेक्षा आकडे जास्त बोलतात,” अशी पोस्ट टाकून वर्ष २०१४ आणि आताची तुलना करणारी एक पोस्ट काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केली आहे. २०१४ मधील रँकिंगमध्ये हिंदुस्थानचा पासपोर्ट ७६ व्या स्थानी होता. मोदींच्या सत्तेत देशाच्या पासपोर्टची ताकद कमी झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे.




























































