अमेरिका आणि इराणमधील तणाव टोकाला, एकमेकांवर जोरदार हल्ले; बहरीन आणि कुवेतमध्ये हाय अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव पुन्हा एकदा कमालीचा वाढला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेने इराणवर थेट हल्ला चढवला आहे. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन आणि कुवेत येथील 85 अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, इराकमधील नजफ येथे इराणचे दिवंगत नेते अली खामेनी यांच्या अंत्ययात्रेचे विधी सुरू असतानाच हे हल्ले झाल्याने आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बहरीन आणि कुवेतमध्ये असलेल्या अमेरिकेच्या 85 लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने भीषण हल्ले केले. या कारवाईत बहरीनमधील अमेरिकी पाचव्या नौदलाचे मुख्यालय आणि कुवेतमधील अली अल-सलेम हवाई तळाला विशेषत्वाने लक्ष्य करण्यात आल्याचे आयआरजीसीने म्हटले आहे. इराणच्या या अनपेक्षित आणि मोठ्या हल्ल्याच्या शक्यतेमुळे बहरीन आणि कुवेतमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बहरीनमध्ये बुधवारी आपत्कालीन सायरन वाजवण्यात आले. बहरीनच्या गृह मंत्रालयाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नागरिकांना शांतता राखण्याचे, तातडीने जवळच्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आणि केवळ अधिकृत माध्यमांद्वारे जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कुवेतची सरकारी वृत्तसंस्था ‘कुना’च्या अहवालानुसार, कुवेतमध्येही इराणच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशभरात आपत्कालीन सायरन वाजवून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी शस्त्रसंधीनंतर अमेरिकेने केलेल्या या लष्करी कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर करारातील पाच महत्त्वाच्या अटी मोडल्याचा थेट आरोप केला. अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणच्या हक्कांमध्ये हस्तक्षेप केला. वारंवार लष्करी कारवायांच्या धमक्या दिल्या, इराणी तेल निर्यातीवर पुन्हा अन्यायकारक निर्बंध लादले, दक्षिण इराणवर हवाई हल्ले केले आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या इस्रायली लष्करी कारवाईला उघड पाठिंबा दिला, असे गालिबाफ यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या या कथित कारवायांमुळे हा संघर्ष भडकल्याचा दावा इराणकडून केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून आपल्या कारवाईचे समर्थन केले आहे. अमेरिकेने दिलेल्या तपशिलानुसार, त्यांच्या लष्करी दलांनी इराणमधील 80 संवेदनशील आणि महत्त्वाच्या तळांवर अत्यंत अचूक आणि प्रभावी हवाई हल्ले केले आहेत. या कारवाईत केवळ जमिनीवरील तळच नव्हे तर, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तैनात असलेल्या इराणच्या 60 हून अधिक लहान लष्करी बोटींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या दोन्ही देशांमधील थेट संघर्षामुळे आखाती प्रदेशात अत्यंत संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण आहे.