मंदिरात जाताना काळाचा घाला, अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंदिरात जाताना मागून येणाऱ्या गाडीने धडक दिल्याने अपघातात हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अमेरिकेतील ‘अपस्टेट न्यूयॉर्क’ परिसरात ही घटना घडली. प्रसन्ना अतलुरी असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून, तिने नुकतेच ‘पेस युनिव्हर्सिटी’च्या ‘लुबिन स्कूल ऑफ बिझनेस’मधून शिक्षण पूर्ण केले होते. या अपघातात अतलुरीसोबत प्रवास करणाऱ्या आणखी एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, प्रसन्ना अतलुरी मूळची आंध्र प्रदेशची रहिवासी असून ‘पेस युनिव्हर्सिटी’च्या ‘लुबिन स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये शिक्षण घेत होती. या घटनेमुळे आंध्र प्रदेशातील तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, अतलुरी आपल्या मैत्रिणींसोबत मंदिरात जात असताना हा अपघात घडला. त्यांची गाडी ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेली असताना, भरधाव वेगाने आलेल्या एका दुसऱ्या वाहनाने तिला मागून धडक दिली.

या दुर्दैवी घटनेनंतर, अतलुरी यांचे चुलत भाऊ रवी कुमार अतलुरी यांनी मृतदेह देशात परत आणण्यासाठी निधी उभारण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, 75 हजार डॉलर्सपैकी 40 हजार डॉलर्सहून अधिक निधी आधीच जमा झाला आहे. हा निधी अंत्यसंस्काराची तयारी, मृतदेह देशात आणणे, कुटुंबीयांचा प्रवास खर्च आणि तिचे प्रलंबित शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी वापरला जाणार आहे. अतलुरी यांच्या कुटुंबीयांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह त्यांच्या मूळ गावी परत आणण्यासाठी प्रशासनाकडेही मदत मागितली आहे.