
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत आपण स्वेच्छेने बांगलादेशला परतणार असून, देशात परतल्यानंतर आपण स्वतःहून न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे हसीना यांनी जाहीर केले आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना शेख हसीना यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “मी मायदेशी परतल्यावर ते मला अटक करू शकतात किंवा माझी हत्याही करू शकतात. तरीही मला माझ्या देशात परत जावेच लागेल. माझी अवामी लीग ही पार्टी, त्याचे नेते आणि कार्यकर्त्यांवर सतत अन्याय आणि दडपशाही सुरू आहे. जरी माझा मृत्यू होणार असेल, तरी तो माझ्याच देशाच्या मातीत व्हावा, जिथे माझ्या आई-वडिलांना दफन करण्यात आलं आहे आणि जिथे त्यांचं रक्त सांडलं आहे.”
डिसेंबरपर्यंत परतण्याची योजना
शेख हसीना आणि अवामी लीगचे इतर अनेक निर्वासित नेते याच वर्षी डिसेंबरच्या आसपास बांगलादेशमध्ये परतण्याची योजना आखत आहेत. हसीना यांनी म्हटले आहे की, त्यांच्या बांगलादेशमध्ये परतण्याबाबत ढाकामधील विद्यमान सरकार किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांशी त्यांची कोणतीही चर्चा झालेली नाही.
दरम्यान, ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये उफाळून आलेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांना सत्ता सोडावी लागली होती. राजीनामा दिल्यानंतर त्या तातडीने बांगलादेश सोडून हिंदुस्थानात आल्या होत्या आणि तेव्हापासून त्या हिंदुस्थानातच निर्वासित म्हणून राहत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारासाठी दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. आंदोलकांवर झालेल्या कारवाईत हसीना यांची भूमिका असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता. तसेच या प्रकरणात बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, शेख हसीना आणि कमाल यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.आता डिसेंबरमध्ये शेख हसीना मायदेशी परतणार या घोषणेने बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.






























































