कॅनडामधील टोरोंटो फेस्टिव्हलदरम्यान गोळीबार, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडामधील टोरोंटो येथील एका प्रसिद्ध फेस्टिव्हलदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दुकाने आणि रेस्टॉरंट्सनी गजबजलेल्या भागात हा गोळीबार झाला असून यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

टोरोंटो पोलिसांच्या माहितीनुसार, सेंट क्लेअर ॲव्हेन्यू वेस्ट आणि अर्लिंग्टन ॲव्हेन्यू परिसराजवळ हा गोळीबार झाला. या भागात ‘साल्सा ऑन सेंट क्लेअर’ हा प्रसिद्ध उत्सव सुरू होता. या उत्सवामुळे परिसरात मोठी गर्दी असतानाच अचानक अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. सात जण जखमी अवस्थेत आढळले, त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता. तर इतर पाच जणांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर टोरोंटो पोलिसांनी तात्काळ संपूर्ण परिसराला वेढा घातला असून तो भाग सील केला आहे. गोळीबार करणारा मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.