
ओमानच्या किनाऱ्याजवळ हिंदुस्थानी खलाशी असलेल्या ‘जीएफएस गॅलेक्सी’ या व्यापारी जहाजावर रविवारी हल्ला झाला. या जहाजावर 11 खलाशी होते. जहाजावरील 11 हिंदुस्थानी खलाशी होते. हल्ला झाल्यानंतर तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जहाजावरील 11 पैकी 10 हिंदुस्थानी नागरिकांना वाचवण्यात आले आहे, तर एक अद्याप बेपत्ता आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, ओमानमधील हिंदुस्थानी दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. शोध व बचाव कार्यात ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. या संकटाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल हिंदुस्थानने ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने या प्रदेशात व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांबद्दल तीव्र खेद आणि चिंता व्यक्त केली आहे. या प्रदेशात व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबलेच पाहिजेत, अशी ठाम भूमिका हिंदुस्थानने मांडली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांनुसार, या प्रदेशातील सर्व आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये मुक्त आणि निर्बाध नौकानयन व व्यापारी व्यवहार लवकरात लवकर पूर्ववत केले पाहिजेत, जेणेकरून जागतिक व्यापाराचा सुरक्षित प्रवाह सुनिश्चित होईल.



























































