3 बायका, 24 मुलं अन् समुद्रात तरंगता महाल; ब्रिटनच्या महाराणीहून गडगंज श्रीमंत असलेल्या कतारच्या माजी शासकाचं निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कतारचे माजी शासक शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचे वयाच्या 74 व्या वर्षई निधन झाले आहे. कतारची सरकारी वृत्तसंस्था क्यूएनएने याबाबत अधिकृत वृत्त दिले आहे. शेख हमद हे दूरदर्शी नेतृत्व होते. त्यांनी आपल्या काळात घेतलेल्या कूटनीतिक आणि आर्थिक निर्णयांच्या जोरावर कतारला जगातील सर्वाधिक श्रीमंत देश बनवले. अर्थात त्यांची ओळख फक्त सत्ता आणि राजकारणापुरती नव्हती तर त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि शाही थाटमाटही सर्वसामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचे होते.

ब्रिटनच्या महाराणीहून अधिक संपत्ती

कतरच्या या शासकाच्या श्रीमंतीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्यांची तुलना थेट ब्रिटनच्या शाही घराण्याशी केली जात असे. फोर्ब्स मासिकाच्या आकडेवारीनुसार, ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे 500 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 4,100 कोटी रुपये) होती. तर शेख हमद यांची वैयक्तिक संपत्ती 2 ते 2.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 20 हजार कोटी रुपये) दरम्यान होती. याशिवाय, ‘द टेलिग्राफ’ आणि ‘द गार्डियन’ सारख्या प्रमुख ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, शेख हमद यांनी स्थापन केलेल्या कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीकडे लंडनमध्ये ब्रिटनच्या शाही कुटुंबाकडे नसेल इतकी मालमत्ता आहे. अर्थात ही तुलना दोन्ही शासकांच्या वैयक्तिक संपत्तीमधील आहे. ब्रिटिश शाही कुटुंबाची एकूण संपत्ती 28 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे, परंतु ती राजा किंवा राणीची वैयक्तिक संपत्ती नसून ट्रस्टच्या अधीन असते. महाराणी एलिझाबेथ यांची वैयक्तिक संपत्ती केवळ 500 दशलक्ष डॉलर्स होती. ही संपत्ती त्या स्वतःच्या इच्छेने खर्च करू शकत होत्या.

3 बायका आणि 24 मुलांचा शाही परिवार

अरब राजघराण्यांच्या अधिकृत नोंदीनुसार, शेख हमद यांनी तीन लग्ने केली होती. त्यांच्या पत्नींची नावे शेखा मरियम, शेखा मोझा आणि शेखा नूरा अशी आहेत. यामध्ये त्यांची दुसरी पत्नी शेखा मोझा बिंत नासिर या त्यांच्या उत्कृष्ट फॅशन सेन्स आणि एज्युकेशन फाउंडेशनमुळे जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली चेहरा मानल्या जातात. शेख हमद यांना या तीन पत्नींपासून एकूण 24 मुले आहेत. यात 11 मुलं आणि 13 मुलींचा समावेश आहे. एवढा मोठा परिवार असूनही, त्यांनी 2013 मध्ये कोणत्याही वादाशिवाय अत्यंत शांततेत आपली सत्ता मुलगा शेख तमीम याच्याकडे सोपवली होती.

समुद्रात तरंगणारा महाल

शेख हमद यांच्या शाही जीवनशैलीचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे त्यांची सुपरयॉट अल मिरकाब. सुपरयॉट टाइम्स आणि आंतरराष्ट्रीय बोटिंग मासिकांच्या मते, 2008 मध्ये तयार झालेल्या या यॉटची अंदाजित किंमत 300 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2,500 कोटी रुपये) आहे. ही जगातील सर्वात मोठ्या आणि आलिशान यॉट्सपैकी एक आहे. याला तरंगता महाल म्हटले जाते. कारण यात भव्य सिनेमा हॉल, इनडोअर स्विमिंग पूल आणि जकुझी, हेलिपॅड, तसेच 24 पाहुण्यांसाठी अत्यंत लक्झरी व्हीआयपी सूट्स आणि इतर सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.

सत्ता बंडखोरीने मिळवली, पण स्वेच्छेने सोडली!

शेख हमद यांचा राजकीय प्रवास एखाद्या चित्रपटासारखा राहिला आहे. बीबीसीच्या आर्काइव्हजनुसार, 1995 मध्ये जेव्हा त्यांचे वडील शेख खलीफा हे स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्या घालवत होते, तेव्हा शेख हमद यांनी कोणताही रक्तपात न करता शांततापूर्ण मार्गाने तख्तापलट करून सत्ता हस्तगत केली होती. सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांनी कतारच्या नैसर्गिक वायू साठ्याचा योग्य वापर करत देशाच्या अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस आणले. ज्या सत्तेसाठी त्यांनी आपल्या वडिलांविरुद्ध बंड केले होते, तीच सत्ता त्यांनी वयाच्या 61 व्या वर्षी स्वेच्छेने आणि शांततेने आपल्या मुलाकडे सोपवून अरब जगतात एक नवा आदर्श निर्माण केला होता.