
देवरुख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.
मोटरसायकलस्वार तरुण तुळसणीच्या दिशेने जात होते. त्याच वेळी देवरुखच्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव कारने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर करत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तिन्ही गंभीर जखमी तरुणांना तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.पाटगाव घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.




























































