
नांदेड शहरातील श्री गुरु गोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव ढासळल्याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) बोर्डाची चार सदस्यीय केंद्रीय चौकशी समिती रविवारी सकाळी 11 वाजता घटनास्थळी दाखल झाली. समितीने प्रत्यक्ष पाहणी करत वापरण्यात आलेल्या मटेरियलचे नमुने जप्त केले असून सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे.
केंद्रीय समितीत आर. के. पांडे, ए. के. श्रीवास्तव, अशोककुमार माथुर आणि छाया राजपूत यांचा समावेश होता. समितीने उड्डाणपुलावरील भराव, मुरूम, गॅबियन नेट, बांधकाम साहित्य तसेच इतर तांत्रिक बाबींची बारकाईने तपासणी केली. पाहणीदरम्यान वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यावेळी समिती सदस्यांनी संबंधित कंत्राटदार KTIL कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर, साइट सुपरवायझर व व्यवस्थापनाची चांगलीच खरडपट्टी काढली. कागदोपत्री माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याचेही समितीच्या निदर्शनास आले.
समितीने उड्डाणपुलावरील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भेगा, दोन गॅपमधील वाढलेले अंतर, दबलेला रस्ता तसेच पावसाचे पाणी बाहेर जाणारे सर्व आउटलेट बंद असल्याचे निरीक्षण नोंदविले. भरावामध्ये अपेक्षित दर्जाच्या मुरूमाऐवजी मातीचे प्रमाण अधिक असल्याने पाणी आत झिरपले, त्याचा दाब वाढून फुगवटा निर्माण झाला आणि त्यातूनच भराव ढासळल्याचा प्राथमिक अंदाज समितीने व्यक्त केला. याचबरोबर उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूलाही अशाच प्रकारचा फुगवटा निर्माण झाल्याचे दिसून आले असून तोही धोकादायक असल्याने तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना समितीने संबंधित यंत्रणेला दिल्या.
पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना समिती सदस्य आर. के. श्रीवास्तव आणि अशोककुमार माथुर यांनी, सध्या कोणताही अंतिम निष्कर्ष देणे योग्य ठरणार नाही. आम्ही केवळ प्राथमिक निरीक्षण केले असून मटेरियलचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तपासणी नंतर अहवाल येईल तो आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष मांडला जाईल, असे स्पष्ट केले.
या पाहणीवेळी KTIL कंपनीचे मुख्य प्रोजेक्ट डायरेक्टर अमित गर्ग, नांदेडचे व्यवस्थापक श्रीकृष्ण सपकाळ, जनरल मॅनेजर अतुल शिंदे तसेच NHAI नांदेड विभागाचे प्रोजेक्ट डायरेक्टर महेश पाटील तसेच NHAI चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष
अवघ्या वर्षभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला झालेल्या या उड्डाणपुलाचा भराव ढासळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्रीय समितीच्या तपासणी अहवालातून या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट होणार असल्याने आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे.





























































