
सुटे पैसे नाहीत म्हणून कंडक्टरने बसमधून प्रवाशाला खाली उतरवले. हा प्रवासी म्हणजे कर्नाटकचे परिवहनमंत्री होते. सर्वसामान्य प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मंत्र्यांनी तोंडाला मास्क लावला आणि कोणत्याही सुरक्षेशिवाय थेट सरकारी बस आणि ऑटोरिक्षाने प्रवास केला. या पाहणीदरम्यान प्रवाशांशी उद्धटपणे वागणाऱ्या आणि हलगर्जीपणा करणाऱ्या एका बसचालकाला आणि कंडक्टरला मंत्र्यांनी तत्काळ निलंबित केले.
परिवहनमंत्री बायराथी सुरेश यांनी हेब्बल ते नागाशेट्टीहल्ली या मार्गावरील बीएमटीसी बसमधून प्रवास केला. त्यांनी कंडक्टरकडे दोन तिकिटे मागितली आणि त्यासाठी 100 रुपयांची नोट दिली. त्यावर कंडक्टरने सुट्या पैशांची मागणी केली. मंत्र्यांनी आपल्याकडे सुटे पैसे नसल्याचे सांगताच उद्धटपणे सुटे पैसे देऊ शकत नसाल तर बसमधून उतरून जा, असे सुनावले. मंत्र्यांनी तोंडाला मास्क लावलेला असल्यामुळे कुणी त्यांना ओळखू शकले नाहीत. कोणतीही वाद न घालता मंत्री शांतपणे बसमधून खाली उतरले. मात्र प्रवाशांना होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल घेत नंतर या चालक आणि कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दोन तासांत दहाहून अधिक बसमधून प्रवास
शनिवारी संध्याकाळी 7.10 ते रात्री 9.10 या दोन तासांच्या कालावधीत मंत्री सुरेश यांनी दहापेक्षा जास्त सरकारी बसमधून प्रवास केला. त्यांनी अनेक मार्गांवर प्रवास करत बस सेवेच्या दर्जाची पाहणी केली. सामान्य प्रवासी म्हणून त्यांनी सहप्रवाशांशी संवाद साधला आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.




























































