
ऊन, वारा, पावसाची पर्वा न करत लाखो भाविक वारीत सहभागी झाले आहेत. मात्र त्यांच्या जिवाशी खेळ करत त्यांना गढूळ आणि दूषित पाणी पुरवले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबद्दल लोक तीव्र संताप व्यक्त करत आहे. सरकार जाहिरातींवर कोटय़वधींची उधळपट्टी करतंय, पण वारकऱ्यांना पाण्यासारखी मूलभूत सुविधा देऊ शकत नाहीत, अशी टीका होत आहे.
पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महायुती सरकार सध्या स्वतःच्या जाहिरातींसाठी जनतेच्या पैशांची कोटय़वधींची उधळपट्टी करत आहे. जर सरकारकडे जाहिरातींसाठी एवढा निधी असू शकतो, तर वारीसारख्या पवित्र सोहळय़ासाठी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल काँग्रेसने केला आहे. वारीतील सोयीसुविधांचा अभाव म्हणजे थेट वारकऱ्यांच्या जिवाशी खेळ असल्याची टीका जात आहे. प्रशानसाकडून पुरवण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसणे हे साथीच्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. आरोग्य प्रश्नाकडे सरकारकडून होणारी हेळसांड येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना घडवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.





























































