
देशाच्या पश्चिम आणि मध्य हिंदुस्थानात पावसाने दडी मारली असल तरीही उत्तर आणि पूर्व भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. जम्मू-कश्मीरच्या पहलगाम, अनंतनाग येथे ढगफुटीमुळे मोठे भूस्खलन झाले. पाणी आणि डोंगराच्या प्रचंड मलब्यात अनेक घरे, वाहने दबली. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये विकासनगर येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे लखवाड जलविद्युत पेंद्रावर मोठय़ा प्रमाणात मलबा वाहून आला. त्यात अनेक वाहने आणि यंत्रे दबून गेली.
जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पश्चिम हिंदुस्थानात प्रचंड पाऊस झाला. त्यानंतर पावसाने ब्रेक घेतला. मात्र उत्तरेकडे जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरखंडसह पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पहलगाम आणि अनंतनागमध्ये ढगफुटी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले. घरे आणि वाहनांवर मलबा वाहून आला. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पहलगाममध्ये आवुरा आणि देहवथू या परिसरात अनेक हॉटेल्सचे मोठे नुकसान झाले. पावसाचा अंदाज आल्यामुळे या भागातील पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. त्यामुळे या घटनेत कोणतीही प्राणहानी टाळता आली. रियासी जिह्यात चिनाब नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.
उत्तराखंडमध्ये अनेक रस्ते बंद
मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे उत्तराखंडच्या अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील सुमारे 126 महामार्ग बंद करण्यात आले आहेत. यमुनोत्री महामार्ग गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. विकासनगर येथे भूस्खलनामुळे लखवाड जलविद्युत पेंद्रावर प्रचंड मलबा वाहून आला. ऋषिकेशमध्ये गंगा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक घाट पाण्याखाली गेले आहेत. या ठिकाणी गंगा नदीतील पाणी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचले आहे. रुद्रप्रयाग येथे मंदाकिनी नदीचीही पाणी पातळी वाढली आहे.




























































