
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत सर्व तिकिटे फुल्ल झाली आहेत. अनेक महत्त्वाच्या गाडय़ांची वेटिंग लिस्टदेखील आता संपली आहे. त्यामुळे कोकणवासीयांची चिंता वाढली असून बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचे कसे, असा मोठा प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणावर आणि जल्लोषात साजरा केला जातो. या काळात ठाणे जिल्हा, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर तसेच मुंबई महानगर प्रदेशातील लाखो चाकरमानी आपल्या गावी जातात. रेल्वे सुटण्याच्या 60 दिवस आधीपासून रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यास सुरुवात झाली आहे. 10 जुलैपासून 8 सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यास सुरुवात झाली आहे, तर 11 जुलै रोजी 9 सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यात येत होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नियमित गाडय़ांचे आरक्षण सुरू होताच प्रवाशांनी तिकिटे बुक करण्यासाठी एकच गर्दी केली; परंतु काही वेळातच मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणकन्या, मंगळुरू एक्स्प्रेससह प्रमुख गाडय़ांच्या सर्व जागा फुल्ल झाल्या आहेत. कोकणकन्या एक्स्प्रेसच्या 8 आणि 9 सप्टेंबर रोजीची वेटिंग लिस्ट वाढत चालली आहे. त्यामुळे नियमित आरक्षणातून तिकीट मिळण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. 9 सप्टेंबर रोजीची वंदे भारत ट्रेनची तिकिटे वेटिंग लिस्टवर गेली असून, ती वाढत चालली आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस, वांद्रे-मडगाव एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस या सर्व ट्रेनची वेटिंग लिस्ट वाढत चालली असून कोकणकन्या एक्स्प्रेस, मंगळुरू एक्स्प्रेस, सुरत-मंगळुरू एक्स्प्रेस, पुणे एर्नाकुलम एक्स्प्रेस या गाडय़ांची 9 सप्टेंबर रोजीची वेटिंग तिकीट मिळणेही बंद झाले आहे.





























































