FIFA World Cup 2026 – कप त्याचाच, स्वप्न जगाचा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<मंगेश वरवडेकर>>

अमेरिकेत वर्ल्ड कप सुरू झाला तेव्हा मला एक भाबडी आशा होती. यावेळी फुटबॉलचा भूगोल बदलेल. इतकी वर्ष वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा युरोप आणि लॅटिन अमेरिकेने जणू सातबारा उतारा काढून ठेवलाय त्यामुळे चर्ल्ड कपवर कुणाचे काही चालतच नाही. एकीकडे बाझील, अर्जेंटिना, उरुग्वे, तर दुसरीकडे जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड. हे आठच फिफाचे जगज्जेते उरलेत. बाकी जगाने फक्त विमानाचं तिकीट काढायचं झेंडे फडकवायचे, दोन-चार मोठ्या संघांना घाबरवायचं आणि शेवटी कपाच्या लग्नात वन्हाडी बनून घरी जायचं. यापेक्षा वेगळं कधी घडलं नाही आणि यंदाही घडणार नाही. उपांत्य फेरीच्या संघांवरून कळून आलेच असेल!

तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत चित्र थोडं बदलतंय असं वाटलं. आफ्रिका यंदा फक्त ढोल घेऊन आलेली नव्हती, ती डावपेच घेऊन आली होती. अरब जग फक्त प्रार्थना घेऊन आलेलं नव्हतं, ते आक्रमकता, वेग आणि छातीत बंड घेऊन आलं होतं. मोरोक्कोच्या पावलांत आत्मविश्वास होता. इजिप्तच्या डोळ्यांत ब्याडस होतं. छोट्या देशांनी मोठ्या फुटबॉल साम्राज्यांच्या खुर्थ्यांना हादरे द्यायला सुरुवात केली होती. मग इजिप्त आला. समोर अर्जेटिना होती. उभा राहतो, पण इजिप्तने नमस्कार केला नाही, कॉलर पकडली. २-१ ची आघाडी चितली. अर्जेटिनाला खरंच बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या उंबरठ्यावर आणलं. आफ्रिका आणि अरब जगाच्या हातात जणू इतिहासाचा पेन आलं होतं, असं वाटलं.

 

मग सामना फिरला. वारने एक गोल रद्द केला. व्हिलनप्रमाणे वारची एण्ट्री झाली. सलाहचे अपील फेटाळले गेले. रेफ्रीच्या एकसुरी निर्णयाने सामन्याचा रंग जबरदस्ती बदलला गेला. असं घडल्यावर कुणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. इजिप्तचीही गेली. याचा लाभ अर्जेटिनाच्या पथ्यावर पडला. ३-२ फरकाने इजिप्त हरला. पण त्या पराभवानंतर स्कोअरबोर्डपेक्षा प्रश्न मोठे झाले. इजिप्तच्या प्रशिक्षकाने पराभवाला बाह्य घटकांना जबाबदार धरले. खेळाडूंनीही उघड उघड संताप व्यक्त केला. जगभरातून इजिप्त लुटला बगला का? असा सवाल झाला. फिफाच्या रेफ्री प्रमुखांनी मात्र निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. सत्य कोणत्या कॅमेऱ्याच्या कोनात आहे. हे वारलाच माहीत. पण एवढं नक्की की, इजिप्तने अर्जेटिनाला घाम फोडला आणि पराभवाच्या वेदनेत संशयाची मिरची पडली.

 

मला वाटलं, ठीक आहे. इजिप्त गेला. तेव्हा आफ्रिकेचा दिवा अजून विझलेला नव्हता. मोरोक्को होता. शुक्रवारी मोरोक्को फ्रान्ससमोर उभा राहिला. लाल जर्सी. डोळ्यांत आग. २०२२ ची आठवण मोरोक्कोवर एका संपूर्ण खंडाची आशा होती. मोरोक्को फक्त स्वतःसाठी खेळत नव्हता. त्याच्या पाठीवर आफ्रिका होती. अरब जग होतं. ‘विश्वचषक तुमच्या वापाचा नाही!’ असं पुरोपला सांगू पाहणारी नवी दुनिया होती, पण नियतीला उपरोधाची किती जबरदस्त आवड असते पाहा। आफ्रिकेचं आव्हान संपवायला फ्रान्सकडून पुढे आले कोण? एम्बाप्पे आणि डेम्बेले। दोघे फ्रेंच. नक्कीच फ्रेंच. पण त्यांच्या कौटुंबिक मुळांच्या कथा आफ्रिकेशी जोडलेल्या आहेत. एम्बाप्पेच्या वडिलांची मुळ कॅमेरूनमध्ये, आईची अल्जेरियन पाश्र्वभूमी. डेम्बेलेच्याही कुटुंबीय मुळांचा धागा आफ्रिकेकडे जातो आणि काल त्यांनीच फ्रान्ससाठी गोल करून मोरोक्कोचा नवास संपवला. फ्रान्स २-० ने जिंकला आणि सलग गोल तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला.

 

इतिहासाने असा विनोद लिहिला की, पु. ल. असते तर त्यांनीही टाळी वाजवली असती. आफ्रिका हरली, पण तिला हरवणाऱ्या पायांतही आफ्रिकेची मुळं होती. मग प्रश्न पडतो, हा विजय युरोपचा की आफ्रिकन प्रतिभेला संधी देणाऱ्या युरोपियन व्यवस्थेचा?

 

इथेच खरी गोष्ट आहे. आफ्रिकेकडे प्रतिभा आहे. अरब जगाकडे जिद्द आहे. आशियाकडे लोकसंख्या आहे. उत्तर अमेरिकेकडे पैसा आहे. पण वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फक्त गुण पुरत नाहीत. व्यवस्था लागते. अकादमी लागते. बालपणापासून प्रशिक्षण लागतं. खेळाडूच्या पायातला चेंडू ओळखणारा प्रशिक्षक लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या सामन्याच्या ८७ व्या मिनिटाला मेंदू थंड ठेवण्याची संस्कृती लागते.

 

युरोपने ती उभी केली. लॅटिन अमेरिकेने ती रक्तात मिसळली. बाकी जग अजून ती शोधतंय. आफ्रिका अप्रतिम खेळते, पण सातत्याच्या शेवटच्या पायरीवर थाप लागते. अरब संघ मोठ्यांना हादरवतात, पण स्पर्धेच्या अखेरच्या आठवड्यात टिकण्यासाठी लागणारी खोली कमी पडते. आशिया एखादा धक्का देतो, पण धक्क्याने साम्राज्य बनत नाही. मग कपच्या घराबाहेर उभे राहून आतल्या पार्टीचे फोटो काढतोय. म्हणून हा वर्ल्ड कप पुन्हा एक कटू सत्य सांगतोय. फुटबॉल जगभर खेळला जातो, पण वर्ल्ड कप अजूनही काही मोजक्या खंडांच्या तिजोरीत आहे. उरलेले खंड चावी शोधत आहेत. इजिप्तने ती कुलपात घातली होती, पण वादग्रस्त निर्णयांच्या धुरात त्यांचा हात निसटला. मोरोक्कोने दरवाजा ढकलला होता, पण फ्रान्सच्या निळ्या जर्सीतल्या आफ्रिकन मुळांनीच तो पुन्हा बंद केला.

 

आता उरलेल्यांकडे पाहा. युरोप पुन्हा छाती फुगवून उभा आहे. लॅटिन अमेरिकेचा अर्जेटिना अजून तलवार घेऊन फिरतोय. त्यांनी वर्ल्ड कपमधलं स्वीस खाते ३-१ असे बंद पाडले. बाकी जगाने पुन्हा बाहेरच्या बाकावर बसण्यातच धन्यता मानली. आता मला निराश व्हायचं नाही. कारण इजिप्तने दाखवून दिलं की अर्जेटिना अमर नाही. मोरोक्कोने दाखवलं की आफ्रिका आता पर्यटनासाठी येत नाही. अरब जगाने दाखवलं की त्यांच्या पायात फक्त तेलाचा पैसा नाही, फुटबॉलची आगही आहे. छोट्या देशांनी-बेटांनी दाखवलं की, नकाशावर आकार लहान असला तरी स्वप्नाला स्केल नसते.

 

यंदाचा फिफा वर्ल्ड कप यूरोप किंवा लॅटिन अमेरिकेकडेच जाईल. जे गेल्या २२ स्पर्धात घडलं होतं ते पुन्हा एकदा घडेल. उपांत्य लढतीत फ्रान्स-स्पेन आणि इंग्लंड-अर्जेंटिना असे युद्ध होईल. म्हणजेच त्यांच्याच कपाटात आणखी एक ट्रॉफी बसेल, पण यावेळी दरवाजावरची टकटक वाढली आहे. आज ती इजिप्तची आहे. काल ती मोरोक्कोची होती. उद्या एखाद्या आफ्रिकन, अरब किंवा आशियाई देशाची असेल. त्याच दिवशी फुटबॉलचा खरा नकाशा बदलेल. कारण वर्ल्ड कपला आता एका नव्या विजेत्याची गरज आहे. नव्या खंडाची नव्या रंगाची. नव्या राष्ट्रगीताची गरज आहे.

तोपर्यंत मात्र एक प्रश्न राहणारच, वर्ल्ड कप जगाचा आहे की अजूनही युरोप आणि लॅटिन अमेरिकेचीच वडिलोपार्जित मालमत्ता? वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न साऱ्यांचेच आहे. सारे ते पाहतात. पण नऊ दशके ट्रॉफीवर नाव त्यांचेच कोरले जातेय. बाकीचे फक्त स्वप्न पाहाताहेत, साकार फक्त यूरोप-लॅटिनचेच होतेय.