बारा दिवसांनंतर नाल्यातून गाडी काढली, वसईच्या पुरात मारुती इको कारचा झाला सांगाडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवडय़ात झालेल्या तुफानी पावसामुळे वसईत अक्षरशः महापूर आला. नद्या, नाले ओसांडून वाहू लागले. हजारो नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचा संसार भिजला. या पुरात अडकलेल्या गाडय़ांचे तर होत्याचे नव्हते झाल्याचे दिसून आले आहे. तब्बल 12 दिवसांनी एका नाल्यातून मारुती इको कार बाहेर काढण्यात आली, पण या कारचा सांगाडा फक्त उरला होता. अशा अनेक गाडय़ांचे प्रचंड नुकसान झाले असून इन्शुरन्स कंपन्या भरपाई देणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

1 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसईच्या राजिवली येथील वाघ्राळपाडा परिसरात कार वाहून गेली होती. मोठय़ा प्रयत्नाने ती पूर ओसरल्यानंतर उशिरा नाल्यातून बाहेर काढली. पण गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. या महापुरामध्ये दोन कार व तीन दुचाकी वाहून गेल्या आहेत. त्यापैकी एक कार सापडली असली तरी अन्य गाडय़ांचा अद्यापी थांगपत्ता लागलेला नाही. इको कारची झालेली दयनीय अवस्था बघून वसईत किती भीषण पूर आला होता याची प्रचीती येत आहे. वसईतील ज्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याचे मालक इन्शुरन्स कंपन्यांकडे लवकरच क्लेम सादर करणार आहेत, पण ही भरपाई केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.