
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानच्या महिला संघाने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडचा 270 धावांनी धुव्वा उडवत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 7 बाद 341 धावांवर डाव घोषित करून इंग्लंडसमोर 457 धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 186 धावांत आटोपला आणि टीम इंडियाने यजमानांना चारी मुंड्या चीत केले.
या ऐतिहासिक विजयाची मुख्य शिल्पकार यष्टीरक्षक-फलंदाज यास्तिका भाटिया ठरली. तिने 145 चेंडूत 14 चौकारांसह 113 धावा करत दमदार शतक झळकावून लॉर्ड्सच्या मानाच्या ‘ऑनर बोर्ड’वर आपले नाव कोरले. यास्तिका व्यतिरिक्त स्मृती मानधनाने 70 आणि रिचा घोषने नाबाद 50 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनने दुसऱ्या डावात 118 धावांत 5 बळी आणि संपूर्ण सामन्यात 8 फलंदाजांना तंबूत माघारी पाठवलं. पण तिची ही कामगिरी संघाचा पराभव टाळू शकली नाही.
A day that goes down in the #TeamIndia WIN the first-ever women’s Test match at Lord’s
Scorecard ▶️ https://t.co/O1rEau8j8n #ENGvIND pic.twitter.com/4mhcx8kKej
— BCCI Women (@BCCIWomen) July 13, 2026
टीम इंडियाने दिलेल्या 457 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या क्रांती गौडने दुसऱ्या डावातही अचूक मारा करत सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्ट आणि माजी कर्णधार हीदर नाईट यांना स्वस्तात बाद केले. टीम इंडियाकडून स्नेह राणाने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर क्रांती गौड, दीप्ती शर्मा आणि सयाली सातघरे यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेत इंग्लंडचा डाव 186 धावांत गुंडाळला. पुरुष संघाच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, महिला संघाने मिळवलेला हा विजय हिंदुस्थानी क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि दिलासादायक ठरला आहे. या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या ब्यूमॉन्टला टीम इंडियाने ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.


























































