
जव्हार तालुक्यातील हिरडपाडा आणि सारसून गावांना दळणवळणासाठी जोडणाऱ्या लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलाची गेल्या २० वर्षांपासूनची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. पावसाळ्यात पुलाअभावी दोन्ही गावांतील आठ हजार आदिवासींचा रोज पुराशी लढा सुरू असतो. जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना रोज ये जा करावी लागते. २००६ पासून सातत्याने निवेदने देऊन व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनासह आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
पाथोडी दहाड मार्गावरील हिरडपाडा आणि सारसून या दोन्ही गावांना जोडणाऱ्या लेंडी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर दोन्ही गावांतील संपर्क पूर्णपणे तुटतो. सारसून ग्रामपंचायतीची सुमारे साडेचार हजार तर हिरडपाडा ग्रामपंचायतीची सुमारे साडे तीन हजार लोकसंख्या आहे. मात्र पूल नसल्याने दोन्ही गावांतील नागरिकांना १५ ते २० किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात दोन्ही गावांतील गर्भवती मातांना दवाखान्यात नेताना मोठी अडचण येते.
हिरडपाडा येथील गगनगिरी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांची शेती नदीच्या दोन्ही बाजूंना असल्याने शेतीची अवजारे, खत, बियाणे तसेच शेतमालाची वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागते. जनावरांची ने-आण करतानाही जीव धोक्यात घालावा लागतो.
प्रशासन ढिम्म
दोन्ही गावांना जोडणारा पूल तयार करावा यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांनी आंदोलने केली. अनेक वेळा निवेदने दिली. मात्र प्रशासन ढिम्म असल्याचा संताप हिरडपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती भोरे (माळी) आणि सारसून ग्रामपंचायतीच्या सरपंच काकडी जंगली यांनी व्यक्त केला. पुलाच्या कामास तातडीने मंजुरी न मिळाल्यास आगामी सर्व निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.




























































