
होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या दोन तेलवाहू जहाजांवर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका हिंदुस्थानी खलाशाचा मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले. या हल्ल्याचा हिंदुस्थानने मंगळवारी तीव्र निषेध केला. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय मार्गांमधील सुरक्षित वाहतुकीत अडथळा आणणे हे चिंताजनक असल्याचे हिंदुस्थानने म्हटले आहे.” या घटनेची गंभीर दखल घेत हिंदुस्थानने सोमवारी इराणच्या उप-राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावल्याचे समजते. हिंदुस्थानने इराणच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावून या घटनेबाबत जाब विचारल्याचे समजते.
ओमानच्या सागरी हद्दीतील होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या ‘मोम्बासा’ (Mombasa) आणि ‘अल बहिया’ (Al Bahiyah) या दोन जहाजांवर इराणने क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाला आपला जीव गमवावा लागला.
या हल्ल्यात जखमी झालेल्या आठ जणांमध्ये सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या हल्ल्यानंतर, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने पुन्हा एकदा अमेरिकेवर आरोप केला आहे. अमेरिकेने ओमानच्या बाजूने असलेल्या “बेकायदेशीर मार्गावरून” जहाजांची वाहतूक सुरू केली, असा दावा इराणने केला आहे. तसेच हा मार्ग धोकादायक असून या भागात सुरुंग पेरण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला.


























































