पुण्यात पाकिस्तानी गुंडाची ‘भट्टी’, ‘एटीएस’चे 65 ठिकाणी छापे, 51 जण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) चारच दिवसांपूर्वी राज्यभर केलेल्या छापेमारीनंतर आज पुण्यात मोठी कारवाई करून 51 जणांना ताब्यात घेतले. पाकिस्तानातील गँगस्टर आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित शहजाद भट्टीशी संपर्कात असल्याच्या संशयावरून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिह्यात 65 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. पुण्यात जमलेली पाकिस्तानी गुंडाची ही ‘भट्टी’ उद्ध्वस्त करत ‘एटीएस’ने त्यांच्याकडून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले. या धडक कारवाईने पुणे हादरले आहे.

पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर तथा दहशतवादी कारवायांशी संबंधित शहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिह्यात मोठी कारवाई केली. पुणे शहरातील कोंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, कोथरूड, पर्वती, तसेच पिंपरी-चिंचवडमधील वाकड, चिखली, कुदळवाडी, म्हाळुंगे, चाकण आणि जिह्यातील शिक्रापूर, शिरूर, रांजणगाव, खेड व राजगुरूनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. ‘एटीएस’च्या 22 पथकांनी 65 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून 51 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप व अन्य डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले असून, त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.

पुन्हा समोर आले ‘कोंढवा कनेक्शन’

दहशतवादविरोधी तपासात कोंढवा परिसराचे नाव समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही दहशतवादी संघटनांशी संबंधित संशयित, कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद संपर्क अशा अनेक प्रकरणांमध्ये कोंढवा परिसर चर्चेत आला होता. त्यामुळे यावेळीही ‘एटीएस’च्या कारवाईत कोंढवा भागातील काही ठिकाणांवर छापे पडल्याने तपास यंत्रणांनी या परिसरावर पुन्हा विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पाच जण ताब्यात

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील पाचजणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये चाकण येथून दोनजण, रावेत येथून एक, वाकड येथील एक आणि भोसरीतील एक अशा पाचजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या पाचजणांपैकी तीनजण मूळचे उत्तराखंड येथील असून, एकजण उत्तर प्रदेश आणि एकजण कर्नाटकचा आहे. चौकशीत या तरुणांकडून शहजाद भट्टीच्या रील्स लाइक करणे, फॉरवर्ड करणे असे प्रकार झाल्याचे समोर आले असून, हे तरुण त्याच्या प्रत्यक्ष संपर्कात नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती ‘एटीएस’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी दिली.