शेजारच्या राज्यांतून महाराष्ट्रात गुटखा तस्करी; पोलिसांना चकवण्यासाठी ट्रकऐवजी चारचाकी वाहनांचा वापर, तुकाराम मुंढे यांनी गस्त वाढवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुटखा विव्रेत्यांविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतल्यानंतर आता गुटखामाफियांनी त्यांची कार्यपद्धती बदलली आहे. त्यांनी उत्पादन केंद्रे राज्याबाहेर हलवली आहेत. त्यामुळे आता बाहेरच्या राज्यांतून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत आहे. इतकेच नव्हे तर पोलिसांना चकमा देण्यासाठी ट्रकऐवजी चारचाकी वाहनांमधून गुटखा आणला जात आहे, अशी धक्कादायक माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुटख्याबाबतची सद्यस्थिती सांगितली. महाराष्ट्रात बंदी असली तरी शेजारच्या राज्यांतून गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. गुटखामाफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई सुरू झाल्यानंतर या टोळ्यांनी आपले जाळे राज्याबाहेर विस्तारले आहे. त्यामुळे छोटय़ा विव्रेत्यांकडे पुरवठ्याचे मार्गही बदलले आहेत. गुटखा बनवणाऱ्या कंपन्या राज्याबाहेरून संपूर्ण साखळी चालवतात. आता या कंपन्यांच्या मालकांवरही एफआयआर नोंदवले जात आहेत, असे मुंढे यांनी सांगितले.

दूध भेसळखोरांना जन्मठेप

महाराष्ट्रात तपासण्यात आलेल्या दुधाच्या नमुन्यांपैकी सुमारे 32 टक्के नमुने ‘असुरक्षित’ आढळले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून दुधातील भेसळ म्हणजे केवळ फसवणूकच नव्हे तर आरोग्य धोक्यात आणणारी आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत भेसळीविरोधात अत्यंत कठोर तरतुदी आहेत. एखादा अन्नपदार्थ किंवा दूध मानवी आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित आरोपीला जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते, असा इशाराही मुंढे यांनी दिला.

‘स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका, विष विकत घेऊ नका’

गुटख्यामुळे कर्करोगासारखे आजार होतात. लोकांनी गुटखा खायचे बंद केले तर गुटख्याचे निर्मूलन सहज शक्य आहे असा विश्वास तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला. स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका, विष विकत घेऊ नका, असे आवाहन त्यांनी राज्यातील नागरिकांना केले.