
उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला, पण नॉर्वेच्या संघाचं स्वागत विजेत्यांप्रमाणेच झालं. ओस्लोच्या रस्त्यांवर एक लाखांहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली. खुल्या बसमधून मिरवणूक, राजघराण्याचं स्वागत आणि ‘वायकिंग रो’च्या घोषणांनी संपूर्ण राजधानी दणाणून गेली. 28 वर्षांनंतर विश्वचषकात पुनरागमन करून ब्राझीलसारख्या संघाला हरवणाऱया या संघाने पराभवापेक्षा देशाचा अभिमान जिंकला.
इजिप्तच्या वीरांना मानवंदना
कैरो-ः अर्जेंटिनाविरुद्धच्या थरारक पराभवाने इजिप्तचा वर्ल्ड कप प्रवास थांबला, पण इजिप्तमध्ये संघाचं स्वागत न भूतो न भविष्यति असंच झालं. एल-अलामेन विमानतळावर हजारो चाहत्यांनी मोहम्मद सलाह आणि सहकाऱयांवर फुलांचा वर्षाव केला. ‘तुम्ही आमचा अभिमान आहात’ अशा फलकांनी परिसर भरून गेला. खुल्या बसमधून मिरवणूक काढण्यात आली.
निळय़ा जर्सीत इतिहासाची हाक
अटलांटा-ः इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना पारंपरिक पांढऱ्या-आकाशी पट्टय़ांऐवजी गडद निळ्या ‘अवे’ जर्सीत उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. चाहत्यांच्या मते, 1986 मधील मॅराडोनाच्या ‘हॅण्ड ऑफ गॉड’पासून इंग्लंडविरुद्धच्या अनेक संस्मरणीय विजयांची साक्षीदार हीच जर्सी आहे. अर्जेंटिनाचे चाहते या जर्सीला शुभसंकेत मानतात.
अटलांटात अभेद्य सुरक्षा कवच
अटलांटा-ः अर्जेंटिना-इंग्लंड लढत ही स्पर्धेतील सर्वाधिक संवेदनशील लढत मानत अमेरिकेतील यंत्रणा सतर्प झाली आहे. एफबीआय, फिफा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त सुरक्षा आराखडा तयार केला आहे. चाहत्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि स्टेडियम परिसरात कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे.




























































