
अंगणात झोपलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला नराधमाने निर्जनस्थळी नेत लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना पेण तालुक्यातील पाटणेश्वर गावाजवळील काजुर्ले आदिवासीवाडीत घडली आहे. या घटनेने अवघा पेण तालुका हादरून गेला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी किरण वाघमारे (२४) याला ताब्यात घेतले आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.
संशयित आरोपी ताब्यात
घटनास्थळी तपास करताना पेण पोलीस सोमवारी रात्री पीडित चिमुकली घरासमोर झोपलेली होती. झोपेत असलेल्या
शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष मुलीला उचलून घेऊन नराधमाने निर्जनस्थळ गाठले आणि घृणास्पद कृत्य केले. मुलगी बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांनी रात्रभर शोधाशोध केली. मात्र मुलगी सापडली नाही. यानंतर पेण पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. आज सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. यानंतर एका निर्जनस्थळी चिमुकलीचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला.
बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होईल, असे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले.




























































