
टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. सहा लाखांहून अधिक शिक्षकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांनी या पेपरचा जणू ‘लिलाव’च मांडला. आग्रा येथील ‘महीम पत्रम प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रेस मधील कामगाराने चक्क बुटात लपवून टीईटीचा पेपर बाहेर आणल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. फक्त आठ हजार रुपयांत हा पेपर विकला असून भिवंडीत येईपर्यंत त्याची किंमत थोडीथोडी नव्हे तर तब्बल दीड कोटीवर जाऊन पोहोचली होती. प्रेस मधून पेपर फोडणाऱ्या या कामगाराचे नाव नरेशकुमार मौहर उर्फ मिकी असे आहे.
नीटचा पेपर महाराष्ट्रात फुटल्याची घटना घडून काही दिवस उलटत नाही तोच भिवंडीत टीईटीचा पेपर फोडणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. २८ जून रोजी टीईटीची परीक्षा घेतली जाणार होती. त्यापूर्वीच दोन दिवस आधी २६ जून रोजी पेपर फुटीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी चक्रे फिरवून दुसऱ्या दिवशी तिघांना पकडले. या प्रकरणाचा तपास करत असताना आतापर्यंत एकूण १२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात हा पेपर आग्र्याच्या प्रेसमधून तिथेच काम करणाऱ्या नरेशकुमार याने बाहेर काढला.
चारही सेट बाहेर आणले
आग्र्याच्या ‘महीम पत्रम प्रायव्हेट लिमिटेड’ या प्रेसमध्ये टीईटी परीक्षेचा पेपर क्रमांक १ व २ असे प्रत्येकी दोन सेट छापले होते. परीक्षेच्या दिवशी कोणताही एक सेट अचानक निवडायचा होता. याचाच फायदा घेत नरेशकुमार मौहर या भामट्याने सतत तीन दिवस या पद्धतीचा वापर करून प्रश्नपत्रिकांचे चारही सेट बाहेर काढले. आश्चर्याची बाब म्हणजे हे पेपर त्याने बुटात लपवून आणल्याची माहितीही समोर आली आहे.
१२ आरोपी अटकेत
टीईटी पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील मुख्य आरोपी ब्रिजेश गुप्ता हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धीरज सिंग, राजीव शाव, आकाशकुमार सरोजकुमार, सुमनकुमारी गुप्ता, सोनूकुमार सिंह, मिथुनकुमार सिंह, कपिल दहिया, संजयकुमार सुरेशचंद्र, बाबुलाल कुशवाहा, नरेशकुमार मौहर उर्फ मिकी, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अशी होती मोडस ऑपरेंडी
टीईटी पेपर फुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता सध्या फरार आहे. त्याची मोडस ऑपरेंडी इतरांपेक्षा वेगळी होती. तो अशा छापखान्यांचा शोध घ्यायचा की, जेथे वेगवेगळ्या राज्यांचे गोपनीय पेपर छापले जातात. तिथल्या कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. छापखान्यात कोणताही पेपर आला, की तो थेट त्याच्या पर्यंत पोहोचायचा. छापखान्यातील कर्मचारी प्रेस मधील पेपर त्याच्याकडे आणून द्यायचे मग तो ज्या राज्यातील आहे तेथील आपले नेटवर्क वापरून ग्राहक शोधून त्याचा सौदा सुरू करायचा. प्रेस मधून ८ हजार रुपयांत हाती आलेला पेपर आपल्या हस्तकामार्फत ८०,००० रुपयांना विकला. पुढे दलालांनी आपापला नफा जोडून हा आकडा भिवंडीत येईपर्यंत दीड कोटीपर्यंत पोहोचला होता. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींकडे पेपरची मूळ प्रत होती.




























































