
पेट्रोलमध्ये सध्या 20 टक्के इथेनॉल मिसळून त्याची विक्री केली जात आहे. पण यामुळे गाड्या खराब होत असल्याची तक्रार सामान्य लोकांनी केली आहे. पण 100 टक्के शुद्ध पेट्रोल हवं असेल तर अधिक पैसे मोजावे लागतील असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
देशभरात इथेनॉलवरून रणकंदन सुरू आहे. इथेनॉलमुळे गाड्यांचे मायलेज कमी झाल्याचे तसेच गाड्या खराब झाल्याची तक्रार होत आहे. असे असले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलमुळे असे काही होत नसल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर आपल्याविरोधात पैसे देऊन हा अपप्रचार केल्याचा आरोपही गडकरी यांनी केला आहे. आता टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ई20 इंधनाविरोधातील मोहीम ही राजकीय हेतूने चालवली जात आहे. काही लोक मला आणि सरकारला लक्ष्य करत आहेत. तसेच ई20 इंधनामुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होते, अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. मात्र, ई10 साठी तयार करण्यात आलेली सर्व वाहने ई20 इंधनावर कोणतीही अडचण न येता चालू शकतात. आतापर्यंत इंजिन खराब झाल्याची एकही तक्रार आलेली नाही, असा दावा त्यांनी वृत्तपत्राशी बोलताना केला.
मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते! गडकरींची कबुली
गडकरी म्हणाले की, ई20 इंधन बाजारात आणण्यापूर्वी त्याची योग्य चाचणी करण्यात आली होती. मायलेजबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांतील वाहतुकीत फारसा फरक जाणवणार नाही. मात्र, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गासारख्या ठिकाणी जास्त वेगाने वाहन चालवल्यास मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते.
ते पुढे म्हणाले की, देशात 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून प्रत्येक पेट्रोल पंपावर ई20 इंधन उपलब्ध आहे. ज्यांना इथेनॉल मिश्रित इंधन वापरायचे नसेल, ते 100 टक्के पेट्रोल वापरू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील, असे नितीन गडकरी म्हणाले.
तसेच 100 टक्के पेट्रोल उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेणे हे पेट्रोलियम मंत्रालयाचे काम असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. काही पेट्रोल पंपांवर फ्लेक्स फ्युएल वाहनांसाठी (FFV) ई 85 (85 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) उपलब्ध आहे. अर्धा डझनहून अधिक वाहन उत्पादक कंपन्या अशी वाहने बाजारात आणण्यासाठी तयार आहेत. ई 85 ची किंमत ई20 पेक्षा कमी आहे. त्यामुळे ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध आहेत, असेही गडकरी यांनी नमूद केले.






























































