
>> देविदास त्रिंबके
एल् निनोमुळे मराठवाड्यात उशिरा दाखल झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी ३२ लाख ६ हजार ९६७ हेक्टरवर पेरणीची लगबग शेतकऱ्यांनी केली. मात्र, अचानक पावसाने काढता पाय घेतल्याने अद्याप १७ लाख ६५ हजार ७६१ हेक्टरवर पेरणीच झाली नाही. त्यातच पेरणी झालेल्या पिकांना पाण्याचा फटका बसल्याने ही पिके कोमेजू लागत असल्याने पुढील दोन ते तीन दिवसात पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणीच्या संकटाला समोरे जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात गेल्या वर्षात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, एन्निनोच्या प्रादुर्भावामुळे या खरीप हंगामात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार राज्यासह मराठवाड्यात पावसाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावली. खरीप हंगामाला झालेल्या उशिरामुळे शेतकऱ्यांनी मोठी लगबग करत खरिपाची पेरणी हाती घेतली होती. मात्र, पेरणी सुरू असताना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने उघड दिली. त्यामुळे मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठ जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्र ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टरपैकी ३२ लाख ६ हजार ९६७ हेक्टरवर सोमवार १३ जुलै अखेर पेरणी केली. उर्वरित १७ लाख ६५ हजार ७६१ हेक्टरवर पेरणी बाकी असतानाच पाऊस उघडला. त्यामुळे अद्याप या क्षेत्रावर पेरणी झाली नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. त्यातच आता पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकेही धोक्यात आली आहेत.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे कृषी विभागाने प्रशासकीय कामकाजासाठी दोन विभाग केले आहेत. त्यात कृषी सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना व बीड या दोन जिल्ह्यांचा समावेश केला, तर लातूर विभागात जिल्ह्यासह धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली यांचा समावेश आहे. लातूर विभागात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून, १२ लाख ३८ हजार ७५१ हेक्टर, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ५९ हजार ५१६ हेक्टर सोयाबीन लागवड झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात कपाशीची ६ लाख ९ हजार ७९६, तर लातूर विभागात ३ लाख ४१ हजार ९४० क्षेत्रावर कपाशी लागवड झाली आहे. तर दोन्ही विभागात १ लाख ९७ हजार ३७३ हेक्टरवर मका लागवड झाली आहे. तर तूर पिकाखाली २ लाख ४३ हजार २३९ हेक्टर क्षेत्र आहे. तसेच खरीपात घेतली जाणारी बाजरी, मूग, भुईमूग, उडिदसह इतर कडधान्य पिकांचे मिळून ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागात करण्यात आली आहे.
पिकांची वाढ खुंटली
पेरणीनंतर काही दिवसातच पावसाने विश्रांती घेतली आहे. त्याचा मोठा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. कपाशी, सोयाबीन, मका या पिकांची वाढ खुंटली असून माळरानावरील पिकांनी माना टाकण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणीचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. कर्जाचा बोजा डोक्यावर घेऊन खरीप पेरणी उरकलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटामुळे धडकी भरली आहे.
१७ लाख हेक्टरवर पेरणीच नाही
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील तब्बल १७ लाख ६५ हजार ७६१ हेक्टर क्षेत्र अद्याप कोरडे असून, त्यावर पेरणीच झालेली नाही. या क्षेत्रावर पेरणीपूर्वीच पाऊस उघडल्याने खरीपाच्या पेरणीला जुलैअखेर उजाडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी खरीप हंगाम अर्ध्यावर आल्यावरही पेरणी न झाल्याने हे क्षेत्र पेरणीविना राहण्याची वेळ आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव, औंढा भागात कोवळी पिके कशीबशी तग धरून उभी आहेत. कोरडी हवा सुटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.




























































