बाहेरून कड्या घालून स्मार्ट मीटर लावले; जुने मीटर लंपास केले, सावरकरनगरच्या डेनिस कंपाऊंडमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांची ‘हात कि सफाई’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाहेरून दरवाजाच्या कड्या घालत स्मार्ट मीटर लावून जुने मीटर लंपास केले जात असल्याचा प्रकार ठाण्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकरनगरमध्ये घडला आहे. धक्कादायक म्हणजे दुपारच्या सुमारास नागरिक वामकुक्षी घेत असताना असे प्रकार सुरू असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. सावरकरनगरच्या डेनिस कंपाऊंडमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांच्या अशा या ‘हात कि सफाई’ विरोधात नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

सावरकरनगरच्या डेनिस कंपाऊंडमधील महावितरण कंपनीच्या ग्राहकांना दिवसाढवळ्या ‘शॉक’ बसू लागले आहेत. रहिवासी दुपारच्या वेळेस झोपेत असताना चक्क दरवाजाला कडी लावून गुपचूप जुने मीटर काढले जात आहेत. त्याजागी नवीन स्मार्ट मीटर लावून महावितरणचे अधिकारी पळ काढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी जवळच्या महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘अरे बापरे असे कसे झाले’… मी आता पुण्याला आहे, सोमवारी चौकशी लावतो, कोण वायरमन आहे ते बघतो. आता तुम्ही शांत रहा, असे अजब उत्तर दिले.

एकत्रित लढा उभारणार

यापुढे प्रत्येक ग्राहक मीटर बॉक्सला कुलूप लावणार आहे. जर एखादा वायरमन चोरपावलांनी आलाच तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देणार आहोत. दरम्यान महावितरणच्या या कारभाराविरोधात सावरकरनगरवासीय एकत्र येत लढा देणार असल्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख राजू शिरोडकर यांनी दिला.