
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी हवामान कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारणा चळवळीतील प्रमुख आवाज सोनम वांगचुक यांना त्यांचे अनिश्चितकालीन उपोषण संपवण्याचे भावनिक आवाहन केले आहे. देशाला त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी आरोग्याला प्राधान्य देण्याची विनंती केली. शबाना आझमी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले, “प्रिय सोनम वांगचुक, आपल्या देशाला तुमच्यासारख्या व्यक्तीची नितांत गरज आहे. तुम्ही अन्यायाविरुद्ध आणि सत्यासाठी उभे राहता. आम्हाला तुमचा अभिमान आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, “आम्ही तुम्हाला उपोषण सोडण्याची विनंती करतो. तुमचे मार्गदर्शन देशभरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देते.”
त्यांनी पुढे नमूद केले की, “ही लढाई पुढेही सुरू राहणार आहे. त्यासाठी तुम्ही निरोगी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत.” दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढत आहे. 28 जूनपासून सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणामुळे त्यांचे वजन सुमारे 8.5 किलोने घटल्याचे सांगितले जात असून, त्यांना अशक्तपणा आणि स्नायूंची झीज जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. असे वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे.
वांगचुक यांच्या समर्थनार्थ अनेक कलाकार पुढे आले आहेत. झीनत अमान, अभय देओल, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, ओमी वैद्य आणि रुबिना दिलैक यांनीही त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करत सरकारने संवाद सुरू करावा, अशी मागणी केली आहे. सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 28 जूनपासून अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे.
कथित परीक्षा गैरव्यवहार आणि नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 20 जुलै रोजी संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणाही करण्यात आली आहे.


























































