
स्वयंपाकघरातील गॅस शेगडीची स्वच्छता ही खूप गरजेची असते. अनेकदा अन्नाचे कण आणि द्रवपदार्थ सांडल्यामुळे, गॅसचे बर्नर अस्वच्छ होतात. अशावेळी गॅसची शेगडी ही स्वच्छ ठेवणे हे खूप गरजेचे असते. अनेकदा आपण गॅसची शेगडी स्वच्छ करतो. परंतु बर्नरकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. त्यामुळेच गॅसचे बर्नर स्वच्छ करणे हे खूप महत्त्वाचे आहे.
गॅस बर्नरची ज्योत निळी न राहता पिवळी दिसत असेल किंवा स्वयंपाकाला जास्त वेळ लागत असेल, तर बर्नरच्या छिद्रांमध्ये तेल आणि घाण साचल्याची शक्यता असते. काही सोप्या उपायांनी ही समस्या सहज दूर करता येते. गॅसचा रेग्युलेटर बंद करा आणि बर्नर पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर बर्नरचे सर्व भाग वेगळे काढा.
एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात लिक्विड डिशवॉश किंवा साबण मिसळा. बर्नरचे भाग 20 ते 30 मिनिटे त्यात भिजवून ठेवा. त्यामुळे चिकटलेली घाण मऊ होते.
जुना टूथब्रश वापरून बर्नर स्वच्छ करा. हट्टी डाग असल्यास बेकिंग सोडा आणि थोडे पाणी किंवा व्हिनेगर मिसळून पेस्ट तयार करा. ती काही मिनिटे लावून नंतर ब्रशने घासल्यास डाग निघून जातात.
बर्नरच्या छोट्या छिद्रांमध्ये सेफ्टी पिन किंवा बारीक धातूची पिन हलक्या हाताने फिरवून अडकलेली घाण काढा. मात्र छिद्रे मोठी होणार नाहीत याची काळजी घ्या.
सर्व भाग स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसा. पूर्णपणे वाळल्यानंतरच बर्नर पुन्हा बसवा. रोज स्टोव्ह पुसण्याची सवय आणि महिन्यातून एकदा सखोल स्वच्छता केल्यास गॅसची बचत होते आणि स्वयंपाकही लवकर होतो.





























































