
आंध्र प्रदेशातील कृषी अधिकारी एन. श्रीहरी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना घडली. पत्नी आणि दोन लहान मुलांसह धावत्या मालगाडीसमोर उडी मारून जीवन संपवले. मुख्य आरोपी कुडुमुला हरिकृष्ण, त्याची पत्नी प्रणिता, चार वर्षांची मुलगी मोहंबिका आणि तीन वर्षांचा मुलगा कौशिक कृष्णा अशी मयतांची नावे आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी 1.22 वाजण्याच्या सुमारास सिंगरायकोंडा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळ ही घटना घडली. चौघांचाही जागीच मृत्यू झाला, असे रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत अप्राकृतिक किंवा संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा क्रम आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सर्व परिस्थितीचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी पुढे नमूद केले.
हरिकृष्ण हा त्याचा मेहुणा आणि नेल्लोर जिल्ह्यातील बुचिरेड्डीपालेम मंडळातील कृषी अधिकारी एन. श्रीहरी यांच्या कथित हत्येतील मुख्य आरोपी होता. श्रीहरी यांचा 15 जून रोजी मृत्यू झाला होता. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने श्रीहरी यांचा मृत्यू झाल्याचे मानले जात होते. मात्र श्रीहरी यांची पत्नी लावण्या यांनी पतीच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल संशय व्यक्त करत नव्याने तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली. त्यानंतर या प्रकरणाला नाट्यमय वळण लागले.
लावण्या यांच्या तक्रारीवरून, पोलीस अधीक्षक डॉ. अजिता वेजेंडला यांनी फेर-तपासाचे आदेश दिले. या तपासात आर्थिक वादातून श्रीहरी यांची हत्या झाल्याचे पुरावे समोर आले. मुख्य आरोपी हरिकृष्णानेच कच रचून श्रीहरी यांना विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा पोलिसांनी केला.
या प्रकरणातील इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र हरिकृष्ण फरार होता. आत्महत्येच्या दोन दिवस आधी, हरिकृष्णने एक सेल्फी व्हिडिओ जारी करत श्रीहरीच्या हत्येतील आपला सहभाग नसल्याचे म्हटले होते. तसेच आपल्याला खोट्या आरोपांत अडकवण्यात आल्याचा दावाही त्याने केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हरिकृष्ण आपल्या मूळ गावी गेला. त्यानंतर पत्नी व मुलांना सोबत घेऊन सिंगारायाकोंडा येथे गेला. तिथे या कुटुंबाने धावत्या मालगाडीसमोर उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


























































