
देशात हाताने विष्ठा उचलण्यावर कायद्याने बंदी घालून दशकाहून अधिक काळ उलटला आहे. केंद्र सरकारने गटार व सेप्टिक टँक साफसफाईचे पूर्णपणे यांत्रिकीकरण करण्यासाठी NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजना सुरू केली असली, तरीही गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना होणारे मृत्यू थांबलेले नाहीत. ही समस्या आजही देशासमोर गंभीर मानवी आणि प्रशासकीय आव्हान म्हणून कायम आहे.
मार्च २०२६ मध्ये लोकसभेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१७ पासून आतापर्यंत देशात गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना किमान ६२२ सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५३९ कुटुंबांना पूर्ण भरपाई, २५ कुटुंबांना अंशतः भरपाई मिळाली आहे, तर ५२ कुटुंबांना अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. तसेच ६ प्रकरणे कोणताही तोडगा न काढता बंद करण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेशात सर्वाधिक मृत्यू
देशात सर्वाधिक ८६ मृत्यू उत्तर प्रदेशात नोंदवले गेले. मात्र, या राज्यातील १३ कुटुंबांना अद्याप भरपाई मिळालेली नाही, तर २ कुटुंबांना अंशतः भरपाई देण्यात आली आहे.
दिल्लीत ६२ मृत्यूंपैकी ९ कुटुंबे भरपाईपासून वंचित आहेत. महाराष्ट्रातही ९ कुटुंबे भरपाईची प्रतीक्षा करत आहेत. गुजरातमध्ये २ कुटुंबांना भरपाई मिळालेली नाही, तर एक प्रकरण बंद करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावरही परिस्थिती चिंताजनक आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे १६ मृत्यू झाले असून त्यापैकी केवळ ८ कुटुंबांना पूर्ण भरपाई मिळाली आहे. ६ कुटुंबांना कोणतीही मदत मिळालेली नाही, तर २ प्रकरणे बंद करण्यात आली आहेत. चंदौली आणि आंबेडकर नगर जिल्ह्यांतील काही कुटुंबेही अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.


























































