
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्यंत दुरावस्था झाली असून, आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षाविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. येत्या 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी जिल्हा परिषदेवर ग्रामस्थांचा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी दिली आहे.
प्रथमेश गावणकर यांनी सांगितले की, वाटद-खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेबाबत मी स्वत: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वाटद-खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांची भेट घेतली त्यांनीही आरोग्य अधिकाऱ्यांना दुरूस्तीबाबत सूचना दिल्या.आज 15 दिवस होऊनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे 22 जुलै रोजी ग्रामस्थ जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढणार आहेत.
वाटद-खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गळती रोखण्यासाठी लोकवर्गणीतून छत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत हे दुर्दैव आहे.जनतेने भरलेल्या करातून आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत अशी मागणी प्रथमेश गावणकर यांनी केली आहे.



























































