शाळेत प्रेमाचे धडे गिरवणारे शिक्षक आणि शिक्षिका निलंबित; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळा हे संस्कार घडविणारे विद्येचे मंदिर असून, या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्ज्वल पिढी घडवत असतात. परंतु उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथील शाळेतील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका वर्गामध्ये प्रेमाचे धडे गिरवत असल्याचे दिसून आले. दोघांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होताच शिक्षण विभागाने चौकशी सुरू करत दोन्ही शिक्षकांवर निलंबित केले आहे.

आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना कन्नौज जिल्ह्यातील सौरिख ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या एका कंपोझिट प्राथमिक शाळेतील आहे. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये वर्गात एक महिला शिक्षिका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिथेच एक पुरुष शिक्षकही उपस्थित आहे. आधी तो महिला शिक्षिकेशी काहीतरी बोलतो आणि ती हसते. त्यानंतर आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तो पुरुष शिक्षक महिला शिक्षिकेच्या जवळ जातो आणि अश्लील चाळे करू लागतो.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी संदीप कुमार यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सौरिखचे गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ पाठक यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले की, व्हिडिओमध्ये दिसणारे शिक्षकांचे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे. शाळा परिसरात अशा प्रकारच्या कृत्यांमुळे विद्यार्थ्यांवर अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो. या अहवालाच्या आधारे दोन्ही सहाय्यक शिक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन कालावधीत एका शिक्षकाला गुगरापूर ब्लॉक रिसोर्स सेंटर आणि दुसऱ्या शिक्षकाला तालग्राम BRC शी जोडण्यात आले आहे. यासोबतच दोघांविरुद्ध विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाकडून या व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी अद्याप सुरू आहे. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणि चौकशीत दोष सिद्ध झाल्यास नियमांनुसार पुढील कठोर कारवाई केली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. सध्या दोन्ही शिक्षक निलंबित असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.