
महाराष्ट्राची ‘लालपरी’ वाढत्या इंधन दरवाढीमुळे अक्षरशः डबघाईला आली आहे. डिझेलच्या दरवाढीचा मोठा फटका बसल्याने एसटीच्या साध्या बससेवांची 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ दुसऱ्यांदा वाढवण्याची वेळ एसटी महामंडळावर आली. त्यानुसार उन्हाळी सुट्टीतील हंगामी भाडेवाढ 31 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार असल्याचे महामंडळाने बुधवारी जाहीर केले. त्यामुळे राज्यभरातील एसटीच्या लाखो सामान्य प्रवाशांना भाडेवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
उन्हाळी गर्दीच्या हंगामात साध्या बससेवांसाठी लागू केलेल्या 10 टक्क्यांच्या हंगामी भाडेवाढीला महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत बुधवारी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या प्रवाशांचे महामंडळाच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. याबाबत मंत्रालयातील बैठक पुढे ढकलण्यात आली. याचदरम्यान हंगामी भाडेवाढ आणखी 15 दिवसांसाठी लागू ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केला. त्यानुसार आता एसटीच्या साध्या बससेवांचे वाढीव भाडेदर 31 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी महामंडळाने 15 एप्रिल 2026 पासून साध्या बससेवांच्या भाडय़ात 10 टक्के हंगामी वाढ लागू केली होती.
महायुती सरकारच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या एसटी बससेवेची आर्थिक घडी सुधारण्यात महायुती सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे उघडकीस आले आहे. तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत सरकारने एसटी महामंडळाला स्वतःचे स्वतः आर्थिक नियोजन करण्याचे अलीकडेच सूचित केले आहे. ‘लालपरी’ला वाऱ्यावर सोडण्याच्या महायुती सरकारच्या कारभारामुळे महामंडळावर वारंवार भाडेवाढ करण्याची वेळ आल्याची तीव्र नाराजी प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.



























































