
अमेरिकेसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरेंडर झाल्याने आता आपला शेतकरी व शेती दोन्हींसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे. शेतकऱयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱया भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर जिह्यातील वैजापूर येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले, मागील 12 वर्षांपासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, पण मोदी मात्र शेतकरी, महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यावर गप्प असून याविरोधात आवाज उठवायला लागेल. भ्रष्टाचार, महागाई आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असे सपकाळ म्हणाले.
नरेंद्र मोदी सरकारला जनतेचे काहीही पडलेले नाही, ते फक्त मोजक्या उद्योगपतींचे हित जपण्यातच मग्न आहेत. ‘हम दो, हमारे दो’ या धोरणातून भाजपचे सरकार अदानी आणि अंबानी या मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचे चित्र देशात आहे.
































































