
नाल्यांतील कचरा वेळेत उपसला जात नसल्यामुळे तो थेट समुद्रात वाहून जात आहे. त्यामुळे निळाशार समुद्र अक्षरशः काळवंडून गेला असून किनाऱ्यावर ठिकठिकाणी तब्बल तीन फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. समुद्रकिनाऱ्यांची अवस्था विदारक आहे. पालिका प्रशासनाच्या निक्रिय, बेजबाबदार कारभारामुळे समुद्रकिनारे प्रदूषित झाले आहेत. याविरोधात शिवसेनेने आवाज उठवला असून पालिकेच्या ढिसाळ कारभाराची चौकशी करून तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जुहू किनाऱ्यावरील कचऱ्याच्या ढिगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबद्दल नागरिकांमध्ये संतप्त भावना असून पालिकेच्या कारभाराविरोधात ताशेरे ओढले जात आहेत. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी जुहू समुद्रकिनाऱ्याला अचानक भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली. ‘नाल्यांतील कचरा वेळेत साफ न झाल्यामुळे तो थेट समुद्रात जाऊन मिळत आहे. कचऱ्याचे थर साचलेले आहेत. ही केवळ अस्वच्छता नाही, तर मुंबई महापालिकेच्या निक्रिय कारभाराचा पुरावा आहे. समुद्रकिनारे आणि महानगरातील अस्वच्छता पाहून त्यांच्या मनात मुंबईबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात. ही केवळ मुंबईची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी आहे, म्हणूनच आम्ही या संपूर्ण प्रकरणावर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची ठाम मागणी करत आहोत,’ असे किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.
भ्रष्ट कारभाराची किंमत मुंबईकरांना मोजावी लागतेय
महापालिकेच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या, एवढा निधी खर्च झाला, पण काम नेमके कुठे झाले? जुहू किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी दररोज सकाळी 75 आणि संध्याकाळी 75 कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे 15 कर्मचारीसुद्धा दिसत नव्हते, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यातील संगनमत मोठय़ा प्रमाणात वाढले आहे, असा आरोपही पेडणेकर यांनी केला.






























































