
उरण नगर परिषदेत भाजपचा पुन्हा एकदा नऊ बाराचा खेळ पाहायला मिळाला. कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाने बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताचा गैरफायदा घेत भाजपच्या १२ सदस्यांनी तब्बल विकासकामांचे ३८ ठराव नामंजूर केले. केवळ नगराध्यक्षपदासह संपूर्ण सत्ता हाती न मिळालेल्या भाजपच्या या नेहमीच्या रडीच्या डावामुळे उरण शहराचा विकास खुंटणार आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांविरोधात संताप व्यक्त होत आहे.
१८ मे रोजी उरण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विकासकामांचे ४४ ठराव मांडण्यात आले होते. ७ ठरावांवरून भाजपच्या १२ सदस्यांनी सभेत गोंधळ घातला. यानंतर हा वाद आणखीनच चिघळला. त्यामुळे नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी भाजपच्या दोन सदस्यांना सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले. मात्र नगराध्यक्षांच्या आदेशाला न जुमानता भाजपच्या नगरसेवकांनी आपली अरेरावी कायम ठेवली. यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पुन्हा सर्वसाधारण सभा बोलावली. मात्र या सभेतही भाजपच्या १२ सदस्यांनी ३८ ठराव बहुमताच्या जोरावर नामंजूर केले. भाजपच्या मुजोर सदस्यांमुळे शहराचा विकास खुंटणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
नेमकं काय घडलं होतं?
भाजप नगरसेवकांच्या आडमुठेपणाला जशास तसे उत्तर १८ मेच्या सभेत दिले होते. त्यावेळी विकासकामांचे ४४ ठराव मंजूर केले. यामुळे तिळपापड झालेल्या भाजपने याविरोधात रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय आपल्या अधिकारात येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर भाजप सदस्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली.
विभागीय कोकण आयुक्तांनी महिलांचे विविध प्रश्न, आरोग्य आणि स्वच्छतागृहासारखे विषय नाकारू नयेत, अशा सूचना केल्या होत्या. मात्र त्यानंतरही भाजप सदस्यांनी ते विषय नामंजूर केले.
-भावना घाणेकर, नगराध्यक्ष































































