सर्व टीमच्या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू; पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय जोशी

नांदेड जिल्ह्यातील सर्व सक्षम टीमच्या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक मिळविण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणवर्ग गुन्हेगारीपासून कसा परावृत्त होईल, यावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती नदिड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सामनाशी बोलताना दिली.

२४ जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गेली तीन आठवडे या विस्तीर्ण जिल्ह्याचा तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आपला अभ्यास सुरू असून, वाढत चाललेली गुन्हेगारी हा समाजाला एक शाप बनला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा त्रस्त आहे. चोऱ्या, दरोडे, आर्थिक बाबींतून होणारे वाद, त्यातून होणारे खुन, कौटुंबिक हिंसाचार या सर्व बाबींकडे आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे प्रचंड बेरोजगारी आणि त्यातून आर्थिक विवंचना, यामुळे तरुण भरकटला आहे. यासाठी या तरुणांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. शहजाद भट्टी, राणा हुसेन यासारखे एजेंट भारतीय तरुणांना पैशांचे आमिष दाखवून संवेदनशील ठिकाणाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. जे तरुण सोशल मीडियावर शस्त्रासह फोटो टाकतात किंवा प्रसिध्दीच्या माध्यमातून त्यांना हे एजेंट लक्ष करतात. यावर आपण बारकाईने लक्ष्य ठेवून असून, आपल्या नेतृत्वाखालील एटीएसचे पथक अशा तरुणांच्या शोधात आहे. केवळ अटक आणि गुन्हे दाखल करणे, यापेक्षा अशा तरुणांचे वेळीच समुपदेशन झाले व त्याचा फायदा समाजालाही होईल आणि सामाजिक स्वास्थ्यदेखील सुरक्षित राहू शकेल. संख्याशास्त्रातील विद्यावाचस्पती पदवी आपण प्राप्त केली असून, संख्याशास्त्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण ते केवळ आकड्यांचे शास्त्र नसून ते भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तविण्याचा आणि अचूक निर्णय घेण्याचे शात आहे. त्याचा फायदा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करून घेण्यासाठी आपण आपल्या टीमला सतर्क केले आहे. डेटा ड्रिव्हन पोलिसिंगमध्ये संख्याशास्त्राचा मोठा वाटा असतो, कोणत्या वेळी आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता जास्त आहे याचे विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकीय मॉडल्स वापरली जातात, त्याचाही उपयोग नांदेड जिल्ह्यासाठी कसा होईल, याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या सायबरच्या संदर्भात वेगवेगळे गुन्हे समोर येत आहेत. आर्थिक, फसवणूक, मोबाईल हॅक करून विविध प्रकारे टॉर्चर करणे, डिजिटल अरेस्ट याबाबतचे अनेक गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी उघडकीस येतात, यावेळी सर्वसामान्य नागरिक घाबरुन जातो, त्यामुळे सोशल मीडिया, फेसबुक, इस्टाग्रामचा वापर करताना अत्यंत काळजी घ्यावी लागेल, 7 असेही ते म्हणाले.

तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका या तीन राज्यांच्या सीमेवर असलेला हा जिल्हा आणि त्याची व्याप्ती मोठी असल्याने प्रत्येक विभागाचा अभ्यास करून परराज्यांतून होणारी गुन्हेगारी, त्यातिकाणाहून होणारे वेगवेगळे गुन्हे, चोऱ्या, दरोडे, अवैध चोरी, याबाबत लक्ष केंद्रित करण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. जिल्ह्यातील सर्वच विभागांची टीम सशक्त असून, सर्वांचे मार्गदर्शन व वेळप्रसंगी त्यांच्या कामातील चुका लक्षात आणून देणे हे माझे परमकर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. निलाभ रोहन यांचा जन्म १९८८ मध्ये उत्तर प्रदेशात झाला. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश दिग्विजयजी नाथ यांचे ते चिरंजीव आहेत. २०१६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करुन त्यांनी आयपीएस कॅडर प्राप्त केले आहे. केंद्रीय संस्थांमध्ये त्यांनी बरेच दिवस काम केले असून, त्यांना केंद्र शासनाचा वीरता पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. हिंगोलीतून त्यांची कारवाई प्रभावी राहिली असून, विशेष म्हणजे त्यांनी हाय प्रोफाईलचा दरोड्याचा गुन्हा २४ तासांत उघडकीस आणला होता. हे विशेष.