
बंगळुरुमधील जयनगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली. लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर जात असताना डोके बाहेर काढताच काँक्रिटच्या बीमला डोके धडकल्याने एका हॉटेल कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दक्षिणा उपहारा हॉटेलमध्ये हा अपघात घडला. राजेश (22) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव असून तो मूळचा धारवाडचा होता. अपघात झाला तेव्हा राजेश हॉटेलमध्ये नवीन सामान घेऊन जात होता.
राजेश वरच्या मजल्यावर सामान नेण्यासाठी कार्गो लिफ्टचा वापर करत होता. लिफ्ट दुसऱ्या मजल्याजवळ पोहोचत असताना, त्याने लिफ्टमधून डोके बाहेर काढले आणि ते काँक्रीटच्या बीमला धडकले. या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे हॉटेल अविनाश नावाच्या व्यक्तीचे आहे. राजेश हा हॉटेल मालकाचा मित्र होता. तो हॉटेलचा कारभारही पाहत होता. राजेशला भविष्यात स्वतःचे हॉटेल सुरू करायचे होते. त्यामुळेच तो हॉटेल व्यवसायातील बारकावे शिकत होता, अशी माहिती मिळते.


























































